28.8 C
Latur
Tuesday, March 18, 2025
Homeमहाराष्ट्रआईच्या प्रियकराला मुलांनी संपविले

आईच्या प्रियकराला मुलांनी संपविले

वाघापूर येथे मध्यरात्री २ वाजता थरार

यवतमाळ : विवाहित महिलेशी अनैतिक संबंध ठेवणे युवकाच्या जिवावर बेतले. लग्नाच्या पत्नीला सोडून युवक महिलेच्या प्रेमात पडला. हा प्रकार सहन न झाल्याने महिलेच्या दोन मुलांनी मित्राला सोबत घेऊन त्याचा खून केला. ही घटना सोमवारी पहाटे २ वाजतादरम्यान वाघापूर येथे घडली. या प्रकरणात लोहारा पोलिसांनी ४ संशयितांना ताब्यात घेतले आहे.

आशिष माणिकराव सोनोने (३४) रा. प्रिया रेसिडेन्सी, चौसाळा रोड, बोधड असे मृताचे नाव आहे. त्याचे वाघापुरातील महिलेशी प्रेमसंबंध होते. याच कारणावरून आशिषची पत्नी मुलीला घेऊन विभक्त राहत होती. १५ मार्च रोजी दुपारी आशिषला प्रेयसीच्या मुलाने जिवे मारण्याची धमकी दिली होती. ही माहिती आशिषने त्याची आई सुनीता सोनोने यांना दिली. १७ मार्च रोजी आशिष त्याच्या प्रेयसीसोबत व्हीडीओ कॉलवर बोलत घराबाहेर निघाला. तो रात्री उशिरापर्यंत परतला नाही.

आशिषला जागीच केले ठार
संतापलेल्या दोघांनी आईच्या प्रियकराला चाकूने भोसकून नंतर त्याच्यावर दगडाने प्रहार केला. यात आशिष सोनोने याचा जागीच मृत्यू झाला. हा हल्ला होत असताना आशिषने आरडाओरडा केल्याने परिसरातील काही नागरिक रात्री २ वाजता घराबाहेर आले होते. सीसीटीव्हीमध्ये हा घटनाक्रम आला आहे. लोहारा पोलिसांना रात्रीच खुनाची माहिती मिळाली. त्यावरून संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात दोन सख्खे भाऊ असून त्यांचे मित्र प्रशिक मुकुंदा दवणे, अंकुश डुबाजी चावरे यांचाही सहभाग आहे. या प्रकरणी सुनीता माणिकराव सोनोने यांच्या तक्रारीवरून लोहारा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास हाती घेतला आहे.

लोहारा परिसरात दुसरी घटना
दारूच्या नशेत दोन सैतानांनी तीन तासांत चार गंभीर गुन्हे केले. एकाला जिवानिशी ठार केले. या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच लोहारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे अनैतिक संबंधातून खुनाची दुसरी घटना घडली आहे. यामुळे लोहारा, वाघापूर परिसरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

वारंवार चिड
आईसोबतचे अनैतिक संबंध पाहून मुलांना राग येत होता. अखेर त्यांचा संयम सुटला. सोमवारी रात्री त्याचा घात केला. वाघापूर येथील एका परिसरात रात्री दोन वाजता आशिष सोनोनेची हत्या करण्यात आली. या घटनेचे काही प्रत्यक्षदर्शीही हादरुन गेले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR