नाशिक : बीड जिल्ह्यातील धोंडराई गावातील रहिवासी असलेले प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक सोमेश्वर भानुदास गोरे (३२, रा. खोली क्र-१५५, दक्षिण वसतीगृह, एमपीए) यांनी महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या आवारातील वसतीगृहाच्या राहत्या खोलीत सोमवार दि. १७ मार्च गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या वर्तुळात खळबळ उडाली.
गोरे हे जानेवारी महिन्यापासून महाराष्ट्र पोलीस अकादमीत प्रशक्षिणार्थी पोलिस उपनिरीक्षक म्हणून प्रशिक्षण घेत होते. सोमवारी दुपारी ते प्रशिक्षण घेत असलेल्या १५ क्रमांकांच्या स्कॉडसह १३, १४ क्रमांकांच्या स्कॉडमधील प्रशिक्षणर्थींची उंटवाडी येथील बाल सुधारगृह भेटीचे आयोजन करण्यात आले होते. पाऊण वाजेच्या सुमारास ही भेट आटोपल्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींना पोलिस नाईक चंद्रकांत पांडुरंग घेर (३२, रा. नेम. कवायत निर्देशक, एमपीए) यांनी वसतीगृहात सोडले. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास स्कॉड फॉलिंग घेण्यात आले.
स्कॉड कॉरपरेर भरत नागरे यांनी घेर यांना कळविले की, प्रशिक्षणार्थी गोरे हे फॉलिंगला हजर राहिलेले नाहीत. त्यानंतर त्यांनी स्कॉड मार्च करून गोरे राहत असलेल्या दक्षिण वसतीगृह खोली क्र-१५५ गाठली. तेथे खिडकीतून आतमध्ये डोकावून बघितले असता ते गळफास घेतलेला असल्याचे आढळून आले, अशी खबर घेर यांनी गंगापूर पोलिसांना कळवली.
घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन गोरे यांचा मृतदेह खाली उतरवून पंचनामा करत शवविच्छेदनासाठी सायंकाळी शासकीय जिल्हा रूग्णालयात पाठवला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास हवालदार किशोर पगार हे करीत आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील दोन भावंडे असा परिवार आहे.