परभणी : जीवन जगत असताना नियतीच्या मनात जे असते तेच घडते. ते जेव्हा तुम्ही मनाने स्वीकारता, तेव्हा तुमची जगण्याची दृष्टी बदलते. जगणे आनंदी होऊ लागते. त्यामुळे जगाकडे पाहण्याची दृष्टी बदला तुमची सृष्टी बदलेल असे प्रतिपादन मुंबई येथील व्याख्यात्या अनघा मोडक यांनी केले.
जागतिक महिला दिनाच्या औचीत्याने स्वातंत्र्य सैनिक कै. शांता श्रीपाद देशपांडे पेडगावकर यांच्या नावे दिल्या जाणारा शांताश्री पुरस्कार दि. १६ मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर येथील आरंभ या संस्थेच्या माध्यमातून ऑटीझम (स्वमग्न) आजाराशी लढणा-या मुलांसाठी कार्य अंबिका टाकळकर यांना प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम येथील गणेश वाचनालयात संपन्न झाला. यावेळी जगण्याचे गाणे होताना या विषयावर मोडक यांचे व्याख्यान झाले.
प्रास्ताविक गणेश वाचनालयाचे श्रीकृष्ण उमरीकर यांनी केले. शाल, श्रीफळ, मानपत्र, व रोख रक्कम असे शांताश्री पुरस्काराचे स्वरूप होते. या सत्काराला उत्तर देताना टाकळकर यांनी स्वत: चा मुलगा ऑटिझम सारख्या आजाराने ग्रस्त होता तेव्हा त्याची सुश्रुषा करता करता त्यांनी त्याच्यासारख्या इतर शेकडो मुलांची सेवा केली त्यातून त्यांची आरंभ ही संस्था आकाराला आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी पुढे बोलताना मोडक म्हणाल्या, वास्तविक तुमच्यासाठी योग्य असणा-या गोष्टी तुमच्यापर्यंत येत असतात. त्या तुम्ही कशा स्वीकारता हाच मुख्य प्रश्न आहे. चांगले संस्कार मुलांना व्यापक मनाची दृष्टी देतात असेही मोडक यांनी नमूद केले. सूत्रसंचालन व आभार विजय कुलकर्णी यांनी मानले.