सोलापूर – सध्या उन्हाचा कडाका वाढला आहे. अशात सरकारने सोलापूरसह राज्यभरातील अंगणवाड्यांची वेळ सकाळी साडेनऊ ते दुपारी चारपर्यंत केली असून यात चिमुकल्या बालकांसाठी सकाळी पावणेदहा ते दुपारी एकची वेळ निश्चित आहे. अशा भर कडाक्याच्या उन्हात चिमुकली मुले अंगणवाडीत कशी तग धरतील, असा सवाल करून आमचे सोडा, किमान त्या चिमुकल्या जीवांचा तरी विचार करा, अशी संतप्त मागणी करीत सोलापूर शहर व जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेटसमोर हल्लाबोल केला.
उन्हाळ्यात अंगणवाड्यांची वेळ सकाळी ८ ते ११.३० करा यासह इतर विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघाच्यावतीने चार हुतात्मा पुतळ्यापासून जिल्हा परिषदेवर छत्री मोर्चा काढण्यात आला. मोर्चा जिल्हा परिषदेच्या पूनम गेटवर आल्यानंतर तेथे मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. त्यावेळी अंगणवाडीताईंनी आपला आक्रोश व्यक्त करीत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
अंगणवाडी कर्मचारी संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड, जिल्हा सरचिटणीस सरला चाबुकस्वार, राज्य उपाध्यक्ष हेमा गव्हाणे, जिल्हा उपाध्यक्ष कांचन पांढरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात सुमारे दोन हजार महिला लाल रंगाच्या साडीत सहभागी झाल्या होत्या. जाहीर सभेनंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना देण्यात आले. यावेळी अंगणवाड्यांची वेळ सकाळच्या सत्रात करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही जंगम यांनी दिल्याचे संघाचे गायकवाड यांनी सांगितले.
अंगणवाडीतील मोबाइलवरून ऑनलाइन हजेरीची (फेस रेकॉग्निशनची) सक्ती बंद करा, उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने अंगणवाडीची वेळ सकाळी ८ ते ११.३० करण्यात यावी, ३ ते ६ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचे फोटो काढण्याची सक्ती बंद करा, प्रोत्साहन भत्त्याच्या निकषातील अटी रद्द करून दरमहा मानधनासोबतच सेविकांना २ हजार तर मदतनिसांना १ हजार रुपये देण्यात यावेत, अंगणवाडी केंद्राची थकीत व सुधारित भाडेवाढ मिळावी, साहित्य अंगणवाडी केंद्रात पोहोच करावे, सेविकांना पोषण ट्रॅकर अॅपचे प्रशिक्षण द्यावे, रजिस्टर व छापील अहवाल फॉर्म द्यावेत, आवश्यक लागणारे रजिस्टरच ठेवण्यात यावेत, बाकीचे बंद करावेत, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेल्या अंगणवाडी सेविकांना तत्काळ ५० रुपये देण्यात यावेत, निकृष्ट टीएचआर बंद करून बालकांना चांगला उत्कृष्ट पद्धतीचा आहार द्यावा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व ग्रॅच्युईटीचा प्रस्ताव अर्थ विभागात गेलेला आहे तो त्वरित मंजूर करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना याचा लाभ देण्यात यावा आदी विविध मागण्यांचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
सध्याच्या कडक उन्हाळ्यामुळे उष्माघातासारखे प्रकार घडू नयेत म्हणून शासनाने प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचा निर्णय घेतला आहे आणि दुसरीकडे प्राथमिक शाळेतील मुलांपेक्षाही लहान जीव असलेल्या चिमुकल्यांची अंगणवाडी केंद्रे मात्र दुपारच्या कडक उन्हात भरविण्यात येत आहेत. हा दुजाभाव कशासाठी ? शासनाने याचा फेरविचार करून अंगणवाड्यांची वेळ सकाळच्या सत्रातच करण्यात यावी, यासाठी आज मोर्चा काढून निवेदन दिले आहे. असे अंगणवाडी कर्मचारी संघ राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी सांगीतले.