26.7 C
Latur
Tuesday, March 18, 2025
Homeसंपादकीयबाबरीनंतर आता कबर!

बाबरीनंतर आता कबर!

अयोध्येतील बाबरी मशीद कारसेवकांनी उद्ध्वस्त केली ही भारताच्या इतिहासातील न विसरता येणारी घटना. त्यानंतर आता भाजपाच्या मौन संमतीने आणि आशीर्वादाने खुलताबाद येथे ३१७ वर्षांपूर्वी बांधलेली औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. याच मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने राज्यात सर्वत्र सोमवारी आंदोलन केले. यावेळी ‘औरंगजेब की कबर खुदेगी, शिवछत्रपती की धरती पर’ अशा घोषणा देण्यात आल्या. औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील वातावरण तापले आहे. अहिल्यानगर शहराजवळील आलमगीर येथे १७०७ साली औरंगजेबाचा मृत्यू झाला होता. या ठिकाणाहून औरंगजेबाचा मृतदेह दफनविधीसाठी संभाजीनगर येथे आणण्यात आला होता. आता या कबरीवरून महाराष्ट्रात वातावरण तापले आहे. औरंगजेबाची कबर काढून टाकावी अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती करू असा इशारा विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने दिला होता.

आता हीच मागणी करत छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर, पुणे, नांदेड, जालना, सिल्लोड, जळगाव, गोंदिया, अकोला, पंढरपूर, मालेगाव, ठाणे, मुंबईमध्ये आंदोलन करण्यात आले. पुण्यात औरंगजेबाच्या फोटोला जोेडे मारण्यात आले, मालेगावात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष करत औरंगजेबाची कबर तोडा अशा घोषणा देण्यात आल्या. गोंदियामध्ये आंदोलकांनी कुदळ घेऊन आंदोलन केले. या आंदोलनाच्या वेळी बजरंग दलाने सरकारला स्पष्ट इशारा दिला की, औरंगजेबाची कबर सरकारनेच हटवावी. जर सरकारने कारवाई केली नाही, तर बजरंग दल कारसेवा करून ही कबर समुद्रात फेकेल. विश्व हिंदू परिषदेने ‘एक धक्का और दो, औरंगजेब की कबर तोड दो’, ‘बजरंग दल मैदान में, औरंग्या की कबर आसमान में’ अशा घोषणा देत आंदोलन केले. आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. त्या ठिकाणी ६०० पोलिस तैनात करण्यात आले आहेत. कबरीच्या बाहेर लोखंडी बॅरिकेड लावण्यात आले आहेत. फक्त एक व्यक्ती जाऊ शकेल एवढीच जागा तिथे ठेवण्यात आली आहे. औरंगजेबाचा जिथे मृत्यू झाला त्या आलमगीर येथेही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. खुलताबाद येथे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून काळजी घेतली जात आहे.

भाजपचे आमदार, मंत्री नितेश राणे म्हणाले, आमच्या महाराष्ट्रामध्ये जी औरंग्याची कबर आहे ती आठवण आम्हाला नको, ही हिंदू समाजाची भावना आहे. ज्या औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून संपवले त्याची कबर कशाला पाहिजे? काहींना ती स्मृती वाटते, काहींना तो इतिहास वाटतो. मात्र, ती घाण आम्हाला नको. आमच्या स्वराज्याच्या विरोधात जे उभे राहिले ती घाण आम्हाला नको आहे. ज्यांना ती स्मृती हवी आहे ती त्यांनी पाकिस्तानात घेऊन जावे. अशा आंदोलनांमुळे नाहक नको ते वाद निर्माण होतात, समाजजीवन बिघडते. त्याचे प्रत्यंतर नागपुरात आले. नागपूरच्या महाल परिसरात हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनानंतर दोन गटांत रात्री दगडफेक आणि जाळपोळ झाल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यात काही गाड्यांची नासधूस करून त्या पेटवण्यात आल्या. या घटनेत काही पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शांततेचे आवाहन केले. या देशामध्ये महिमामंडन (उदात्तीकरण) होईल ते फक्त छत्रपती शिवरायांच्या मंदिराचे, औरंगजेबाच्या कबरीचे नव्हे. पुरातत्व विभागाने ५० वर्षांपूर्वी औरंगजेबाच्या कबरीस संरक्षित स्थळ घोषित केल्याने त्याच्या रक्षणाची जबाबदारी शासनाची आहे. हे आमचे दुर्दैव आहे.

ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारले, त्याच्याच कबरीचे संरक्षण आम्हाला करावे लागत आहे. पण काहीही झाले तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण होऊ देणार नाही, असे वचन छत्रपती शिवरायांच्या मंदिराच्या समोर देत आहे अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्ताने (तिथीनुसार) भिवंडीवाडा रस्त्यावरील मराडे पाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या देशातील पहिल्या मंदिराचे सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. संगमनेर येथे ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना अटक करण्यात आली तो संगमेश्वरचा वाडाही सरकार विकासासाठी घेणार आहे. सरकार तिथे स्मारक बांधणार आहे.

आग््रयात ज्या ठिकाणी औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना कैद केले होते ती जागाही स्मारक विकसित करण्यासाठी देण्यात यावी यासाठी सरकारने उत्तर प्रदेश सरकारला विनंती केली आहे. महाराष्ट्रात देवाभाऊंचे कायद्याचे राज्य आहे, जे काही होईल ते कायद्यानेच होईल. औरंगजेबाच्या कबरीला उखडून टाकावे. मात्र, जर या कबरीला हटविण्यात येत नसेल तर औरंग्याच्या थडग्यावर थुंकण्याची व्यवस्था करा, असे भाजपचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर यांनी म्हटले आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव म्हणाले, सरकारला आजच औरंगजेबाची कबर दिसली का? जिथे घरोघरी चुलीऐवजी घरे पेटतील असे कोणतेही काम शासनाने करू नये. तुम्हाला समाजा-समाजात भांडणे लावून स्वत:ची पोळी भाजायची आहे काय, असा सवालही त्यांनी केला. हिंदुत्ववादी संघटनांच्या या आंदोलनावर काँगे्रसने टीका केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले,

या लोकांना आता दुसरे कसलेही काम उरलेले नाही त्यामुळे त्यांना असे उद्योग सुचत आहेत. महाराष्ट्राची शांतता भंग करण्याचे हे काम आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, राज्यात आणि देशात भाजपचेच सरकार आहे. मग त्यांना कबरीबाबत निर्णय घेण्यास कोणी अडवले? शासनाने थेट कारवाई करावी. उगाच आंदोलन आणि नाटकं कशाला करता? कबर केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. त्यांनी एक आदेश काढून कबर हटवण्याची हिम्मत दाखवावी! एकूण काय असे धार्मिक विषय अवघड जागी दुखणे ठरतात!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR