लातूर : प्रतिनिधी
येथील सरस्वती संगीत महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गोवा येथे राधाकृष्ण संगीत अकादमी, गोवा आणि हाउसिंग बोर्ड रेसिडेंट असोसिएशन साखळी, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने महालक्ष्मी सभागृहामध्ये शास्त्रीय संगीत महोत्सवाचे भव्य आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती संगीत महाविद्यालयाचे प्राचार्य तालमणी डॉ. राम बोरगांवकर आणि गोव्याचे सुप्रसिद्ध तबलावादक पं. तुळशीदास नावेलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गुरुवर्य रामचंद्र नाईक, प्रा. संतोष मळीक, दत्ताराम माडकर, अनिल जल्मी, संतोष भगत, प्रभानंद पाडलोस्कर, महादेव देसाई, साखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सिद्धी प्रभू परब, माधव बोडके उपस्थित होते.
याप्रसंगी राधाकृष्ण संगीत अकादमीच्या ७५ गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आले. याप्रसंगी डॉ. राम बोरगांवकर यांचा गोव्याचे सुप्रसिद्ध तबलावादक पं. तुळशीदास नावेलकर, ज्येष्ठ गायक रामचंद्र नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या शास्त्रीय संगीत महोत्सवामध्ये कार्यक्रमाच्या प्रारंभी अनुजा व अनुष्का नाईक यानि जुगलबंदिमध्ये राग शाम कल्याण रागामध्ये बडा ख्याल आणि तराणा आळवला. त्यांना हार्मोनियम साथ भास्कर गावस व तबला साथ वासुदेव च्यारी यांनी केली. त्यानंतर गुरूदास गावकर त्यांनी राग नायकी कानडामध्ये बडा ख्याल आणि दृत बंदीश सादर केली. त्यांना हार्मोनियम साथ गोपीनाथ गावस व तबला साथ गोविंद गावस यांनी केली. त्यानंतर वासुदेव च्यारी यांनी रूपक तालामध्ये तबला एकल वादन केले. त्यांना नगमा साथ भास्कर गावस यांनी केली. अकादमीचे संस्थापक गुरूवर्य रामचंद्र नाईक यांच्या गायनाने कार्यकृमाची सांगता करण्यात आली. त्यानी राग यमन मध्ये बडा ख्याल, दृत बंदीश, तराणा सादर केला आणि भवानी दयानी ही भैरवी बहरदरपणे सादर केली. त्यांना रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्यांना हार्मोनियम साथ स्मितल मळीक व तबला साथ मिलिंद परब यांनी केली. तानपुरा साथ महेश गावडे यांनी केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सालेलकर यांनी केले. तर आभार नाईक यांनी मानले.