मेरठ : प्रतिनिधी
नवी दिल्लीत श्रद्धा वालकर या तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करीत तिच्या शरीराचे तुकडे करण्यात आले होते. त्यानंतर मुंबईतही असाच प्रकार समोर आला होता. मनोज साने या व्यक्तीने लिव्ह इन पार्टनर महिलेची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे अक्षरश: कुकरमध्ये शिजवल्याचा किळसवाणा प्रकार घडला होता. त्यानंतर आता मेरठमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका पत्नीने आपल्या प्रियकरासह पतीची हत्या केली. यानंतर तिने पतीच्या मृतदेहाचे १५ तुकडे केले.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पत्नीने आधी प्रियकरासोबत मिळून पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या. यानंतर सु-याने त्याची हत्या केली. ती इथपर्यंत थांबली नाही. तर तिने पतीच्या शरीराचे १५ तुकडे केले. हे सर्व तुकडे तिने ड्रममध्ये टाकले आणि ड्रम सिमेंटनी बंद केला. आरोपी महिलेचे नाव मुस्कान असून प्रियकराचे नाव साहिल असल्याचे समोर आले आहे. तर मृत तरुणाचे नाव सौरभ राजपूत (२९) आहे.
सौरभ राजपूत अमेरिकेत एका कंपनीत मर्चंट नेव्हीमध्ये काम करीत होता आणि २४ फेब्रुवारीला आपल्या सहा वर्षांच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भारतात आला होता. या भयानक घटनेनंतर सौरभबद्दल शेजारी, नातेवाईक विचारपूस करू लागले. तो हिल स्टेशनला गेल्याचे मुस्कान सांगत होती.
यासाठी मुस्कान आणि साहिल मृत सौरभचा फोन घेऊन हिमाचल प्रदेशातील कौसानीला गेले होते.
पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी सौरभच्या फोनवरून मुस्कानने कौसानीमधील काही व्हीडीओ आणि फोटो सोशल मीडियावर अपलोड केले होते. मात्र सौरभच्या कुटुंबीयांचा संशय बळावल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार केली. जेव्हा मुस्कान आणि साहिलला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पोलिसी खाक्या दाखवित विचारपूस केली तेव्हा दोघांनी आपला गुन्हा कबूल केला. शेवटी त्यांनी खरे सांगितले आणि सौरभचा मृतदेह ड्रममध्ये असल्याचे सांगितले.
मेरठच्या इंदिरानगरमध्ये राहणारे सौरभ आणि मुस्कान यांनी २०१६ मध्ये प्रेमविवाह केला होता. तेव्हा सौरभने मर्चंट नेव्हीतील आपली नोकरीही सोडली होती. यावर कुटुंबीयांनी आक्षेप घेतला होता. शेवटी कुटुंबीय आणि सौरभमध्ये वादावादी झाल्याने तो मुस्कानसोबत वेगळं राहू लागला. २०१९ मध्ये मुस्कानला एक मुलगी झाली. यादरम्यान मुस्कान सौरभचाच मित्र साहिलच्या प्रेमात पडली. सौरभला याबाबत कळाल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद झाला. त्यावेळी हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले. मात्र मुलीच्या भविष्याचा विचार करून दोघांनी एकत्र राहण्याचे ठरवले. यादरम्यान सौरभ २०२३ मध्ये नोकरीसाठी पुन्हा अमेरिकेला गेला. यानंतर मुस्कान आणि साहिल यांच्यातील प्रेम वाढले आणि त्यांनी सौरभची हत्या करण्याचा प्लॅन केला. संधी साधत ४ मार्च रोजी त्यांनी सौरभची हत्या केली.