अमरावती : प्रतिनिधी
राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मात्र राज्यातील शेतक-यांचे आणि कष्टक-यांचे प्रश्न मार्गी लागत नसल्याची टीका विरोधक करत आहेत. यामुळे प्रहार संघटनेचे बच्चू कडू रायगडावर अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. प्रहार नेते बच्चू कडू यांनी शेतक-यांच्या प्रश्नासाठी रायगडावर अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे
दरम्यान, प्रहार संघटनेचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने दिव्यांग व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. उद्यापासून प्रहार संघटना शेतक-यांसाठी रस्त्यावर उतरणार आहे. आंदोलनाची घोषणा बच्चू कडू यांनी केली असून यामुळे राज्य सरकारपुढे आणखी अडचणी वाढणार आहेत.
उद्यापासून (दि. २१ मार्च) पासून दिव्यांग मंत्रालयाचे माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात अन्नत्याग आंदोलन केले जाणार आहे. पुढील तीन दिवस हे अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच २३ मार्च शहीद दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारी हे आंदोलन होईल, अशी माहिती संयोजक सचिन साळुंखे व ओंकार साळुंखे यांनी दिली आहे.