लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयात ढगाळ वातारवण तयार झाल्याने खरीप हंगामातील तूर, रब्बी हंगामातील हरभरा पिकावर आळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. तुर व हरभरा पिकावरील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी किटकनाशके व बुरशी नाशक औषधांची फवारणी करून सदर रोगावर नियंत्रण मिळवता येते. यामुळे शेतक-यांच्या खिशाळाला मात्र झळ बसणार आहे. लातूर जिल्हयात २ लाख ९९ हजार ९२८ हेक्टरवर रबीची पेरणी झाली असून यात हरभ-याची २ लाख ४८ हजार ४९६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तसेच ज्वारीचा २७ हजार ५३६ हेक्टरवर, मका १ हजार ३४२ हेक्टर, गहू ७ हजार ४५२ हेक्टर, करडई १४ हजार ५०५ हेक्टर, सुर्यफूल ३१ हेक्टर, जवस ७४ हेक्टरवर आदी पिकांचा पेरा झाला आहे.
यावर्षी जिल्हयात वार्षीक सरासरीच्या ६९.१८ टक्के पाऊस झाला आहे. या पावसाच्या आधारावरच जमिनीतील ओलाव्यानुसार शेतक-यांनी रबी पिकांची पेरणी केली आहे. हरभ-याचे पिक सध्या वाढीच्या आवस्थेत आहे. तसेच खरीप हंगामात तुर या पिकाचा ६४ हजार ३९६ हेक्टरवर पेरा झाला आहे. तुर हे पिक शेंगा भरण्याच्या आवस्थेत आहे. गेल्या आठ दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे तुर व हरभरा पिकांना चांगला आधार मिळाला होता. मात्र गेल्या दोन-तीन दिवसापासून तयार झालेल्या ढगाळ व टमट वातावरणामुळे तूर व हरभरा पिकावर बुरशीनाशक व किटक नाशक रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सदर रोगाचा प्रादुर्भाव प्राथमिक आवस्थेत असताना औषधी फवारणी करून त्या रोगावर नियंत्रण मिळवणे शक्य होते.