39.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रएसएससी बोर्ड पुर्णत: बंद पाडण्याचा डाव

एसएससी बोर्ड पुर्णत: बंद पाडण्याचा डाव

सीबीएसई पॅटर्नवरून सुप्रिया सुळेंची टीका राज्याची उज्ज्वल शिक्षण परंपरेला मोडण्याचा कट

मुंबई : महाराष्ट्रातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल केली होती. शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या या घोषणेनंतर राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली होती.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या माध्यमातून राज्याचा एसएससी बोर्ड पूर्णत: बंद करण्याचा डाव या सरकारने आखला आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या आपल्या प्रतिक्रियेमध्ये सुप्रिया सुळे यांनी लिहिले की, महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात शिक्षणमंत्र्यांनी राज्यात सीबीएसई पॅटर्न लागू करण्याची घोषणा केली आहे.

राज्याला अतिशय उज्ज्वल शिक्षण परंपरा आहे. पण तिच्याकडे दुर्लक्ष करून इतर बोर्डाचे अनुकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला ही अतिशय खेदजनक बाब आहे. या माध्यमातून राज्याचा एसएससी बोर्ड पूर्णत: बंद करण्याचा डाव या सरकारने आखला आहे असे दिसते.

फेरविचार करण्याची मागणी
संत, सुधारक आणि शिक्षणाची उज्ज्वल परंपरा असणा-या आपल्या महाराष्ट्राची ओळख या निर्णयामुळे पुसणार तर नाही ना अशी शंका वाटते. हा निर्णय अभिजात भाषा मराठी, संस्कृती आणि परंपरेला मारक ठरणार आहे. माझी राज्य सरकारला नम्र विनंती आहे की कृपया आपण या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

सुळेंचे पत्र व्हायरल
सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना लिहिलेले पत्रही सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पत्रामधून सुप्रिया सुळे यांनी दादा भुसे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. तसेच हा निर्णय रद्द करण्याची घोषणा शिक्षणमंत्र्यांनी सभागृहातून करावी, असी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR