नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्याची शिफारस केली आहे. वर्मा यांच्या सरकारी बंगल्यात आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोख रक्कम सापडली. त्यानंतर ही शिफारस करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध चौकशी किंवा महाभियोग चालविला जाऊ शकतो, अशीही चर्चा सुरू झाली आहे.
वर्मा यांच्या सरकारी निवासस्थानाची आग विझविताना त्यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आली. बेहिशेबी रक्कम जप्त झाल्याची अधिकृत नोंद करण्यात आली असून मुख्य न्यायाधीशांना याबद्दल माहिती देण्यात आली.
यानंतर कॉलेजियमच्या बैठकीत त्यांच्या बदलीची शिफारस करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालील कॉलेजियमला त्यांची दुस-या उच्च न्यायालयात बदली करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या घडामोडीनंतर, काही न्यायाधीशांनी चिंता व्यक्त केली आहे. केवळ बदल्यांमुळे न्यायव्यवस्थेची प्रतिमा खराब होईल. म्हणूनच चौकशी आणि महाभियोग प्रक्रियेवरही चर्चा केली जात आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणानंतर आता न्यायाधीश वर्मा यांचा राजीनामा होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.