नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उपराजधानी नागपुरात आजपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे राज्यातील दिग्गज नेत्यांनी नागपुरात तळ ठोकला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अधिवेशनात दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहण्यात येईल.
शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, बेरोजगारी, महागाई, ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा तिढा, अशा सगळ्याच विषयांवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे महायुतीतील मंत्रीही विरोधकांना तेवढ्याच जोरदारपणाने प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.
शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी विरोधक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात चांगलेच आक्रमक झाले. त्यासाठी विरोधकांनी विधिमंडळावर मोर्चा काढला. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळावर मोर्चा काढल्याने विरोधकांनी आपले मनसुबे दाखवून दिले आहेत. विधिमंडळाच्या पाय-यांवर बसून विरोधकांनी आंदोलन सुरू केले आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, नाना पटोले, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, आदी सगळ्याच विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले आहे. यावेळी विरोधकांनी गळ्यात संत्र्यांच्या माळा घालून विधिमंडळाच्या पाय-यांवर आंदोलन केले.
सरकारचे शेतक-यांकडे दुर्लक्ष : वडेट्टीवार
विधिमंडळ परिसरात विरोधकांकडून शिंदे सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या कामकाजावर टीका केली. राज्यातील सरकार शेतक-यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष नाही. अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आहे. सरकार शेतक-यांकडे लक्ष देत नाही. मदत देत नाही. कापसाला भाव नाही. सोयाबीनला भाव नाही. सरकार शेतक-यांकडे दुर्लक्ष करत आहे. सरकारने कर्जमाफी केली पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.