जेरुसलेम : गाझातील सर्वात मोठे रुग्णालय ”अल शिफा’मधील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. हॉस्पिटलचे डॉक्टर मारवान अबुसादा यांनी माध्यमांना एक व्हॉईस नोट पाठवली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, युद्धामुळे विस्थापित झालेले सुमारे ५५ हजार लोकांनी रुग्णालयात आश्रय घेतला आहे. त्यांना राहण्यासाठी कोठेही जागा शिल्लक नाही. रुग्णांचा रूग्णालयाकडे येण्याचा ओघ थांबत नाही. रविवारी सुमारे १०० रूग्णांना इतर रूग्णालयात हलवण्यात आले आहे, परंतु आणखी बरेच रूग्ण रूग्णालयात येत आहेत. दर अर्ध्या तासाने मोठ्या संख्येने जखमी लोक रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेस्थेटिक्स, पेन किलर आणि अँटीबायोटिक्सच्या कमतरतेमुळे परिस्थिती खूप कठीण होत आहे. आम्ही यापेक्षा जास्त काही करू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. हमासचे मुख्य कमांड सेंटर अल शिफा हॉस्पिटलच्या अंतर्गत चालवले जात असल्याचा इस्राईलचा दावा आहे, मात्र हमासने इस्राईलचा हा दावा फेटाळून लावला आहे. रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांनी सुरक्षेची मागणी केली आहे. गाझा शहरातील रहिवाशांचा हवाला देत वृत्तसंस्थेने वृत्त दिले होते की, इस्रायली युद्ध विमानांनी रविवारी रात्रभर रुग्णालयाजवळ हल्ले केले होते. तसेच रुग्णालयाच्या आजूबाजूचे रस्ते खराब झाले आहेत.