नागपूर : नागपूर येथे आजपासून (दि. ७) विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक हे सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसलेले दिसले. यावरून माजी मंत्री नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक मनी लाँड्रिंग प्रकरणात गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ अटकेत होते. त्यानंतर या प्रकरणात त्यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर ते आता हळूहळू राजकारणात पुन्हा सक्रिय होताना दिसत आहेत. त्यांच्या सुटकेनंतर सभागृहात उपस्थित राहण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे. ते २०२२ च्या अधिवेशनात गैरहजर होते.
त्यानंतर ब-याच प्रतीक्षेनंतर ते विधानसभा सभागृहात हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहिले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याने माजी मंत्री नवाब मलिक कोणत्या गटाकडे जाणार याची उत्सुकता होती. आज अधिवेशनादरम्यान सत्ताधा-यांच्या शेवटच्या बाकावर बसत नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला जाहीर पाठिंबा दिला.