नागपूर : हिवाळी अधिवेशन लहान, मोठ्या व्यापा-यांसाठी पर्वणी ठरणार आहे. या अधिवेशन काळात शहरात तब्बल साडेचार हजार कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नागपूर करारानुसार हिवाळी अधिवेशन उपराजधानीत घेतले जाते. अधिवेशनाचा कालावधी कमी असला तरी आलेल्या कर्मचा-यांची सरबराई करण्यात स्थानिक विभागाचे अधिकारी सज्ज आहेत.
अधिवेशनासाठी हजारो कर्मचारी व मोर्चासाठी लाखो नागरिक १५ ते २० दिवसांच्या कालावधीसाठी शहरात येतात. अधिका-यांसाठी गाड्यांची व्यवस्था केली जाते. रविभवन व आमदार निवासात रोजंदारीने कामगार नेले जातात. या काळात शहरातील खानावळी हाऊसफुल असतात.
बर्डी, महाराजबाग परिसरातील खानावळींमध्ये सायंकाळनंतर बसायला जागा मिळत नाही. अधिकारी व मंत्री हॉटेलमध्ये वास्तव्याला असतात. त्यामुळे पानटपर
चालक ते हॉटेलचालकांसाठी हा सुगीचा काळ असतो. वेळेवर दुप्पट भाडे देण्याची तयारी असतानाही खोली मिळणेही अवघड होते. त्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. अधिवेशनाच्या निमित्ताने हॉटेल्सही हाऊसफुल झाले आहेत.
हिवाळी अधिवेशन, त्यापाठोपाठ नाताळच्या सुट्या आणि नववर्षाचे स्वागत अशा तिहेरी योगामुळे हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीला ‘अच्छे दिन’ आले आहेत. अधिवेशनामुळे शहरासह आजूबाजूचे रिसॉर्टही हाऊसफुल झाले आहेत. केंद्रीय मंत्री आणि उपमुख्यमंत्री नागपुरातील असल्याने कायम हॉटेलमध्ये गर्दी असते.
अधिवेशनामुळे त्यात अजूनच भर पडली आहे. उद्या गुरुवारपासून हिवाळी अधिवेशामुळे शहरातील मोठ्या हॉटेलमधील खोल्या बुक आहेत. २० डिसेंबरपर्यंत अधिवेशन राहणार आहेत. त्याअनुषंगाने मंत्री, आमदार, त्यांचे कार्यकर्ते यांचा फौजफाटा शहरात दाखल होत आहे. त्यांनी शहरातील हॉटेलातील खोल्या अॅडव्हान्समध्ये बुक केल्या आहेत..
संत्रा बर्फीला मागणी
शनिवार व रविवारी सुटीच्या दिवशी ताडोबा, पेंच, नागझिरा, सिल्लारी येथे पर्यटनासाठी अधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने जातात. नागपूर सोडताना मंत्री, आमदार, नेत्यांकडून खास संत्रा बर्फीची मागणी केली जाते. अधिवेशनाच्या शेवटी लाखो रुपयांच्या मिठाईची विक्री होते. ही सर्व उलाढाल सुमारे अडीचशे कोटींच्या आसपास असते. अधिवेशनाच्या निमित्ताने शहरात व बाजारपेठांमध्ये चैतन्य निर्माण होत असते. याशिवाय संत्र्यांची मागणी वाढते. नागपूरच्या सावजी हॉटेलची विशेष क्रेझ सर्वच पाहुण्यांना असल्याने त्यांची उलाढालही वाढते.