39.2 C
Latur
Monday, April 21, 2025
Homeमहाराष्ट्र‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा देणा-यांकडून ‘सौगात’चे वाटप निव्वळ राजकीय नाटक

‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा देणा-यांकडून ‘सौगात’चे वाटप निव्वळ राजकीय नाटक

उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांवर टिका

मुंबई : प्रतिनिधी
ज्या धर्मात विष पेरले, निवडणुकीमध्ये ‘एक है तो सेफ है… ‘बटेंगे तो कटेंगे’ चा नारा दिला. ते आता मुस्लिमांच्या घरात जाऊन ‘सौगात’चे वाटप करणार आहेत. पण हे ‘सौगात ए मोदी’ नसून ‘सौगात ए सत्ता’ आहे, अशी टीका शिवसेना ( ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. सौगातमुळे हिंदुच्या मंगळसुत्राचे संरक्षण कोण करणार असा सवाल करतानाच आमच्यावर हिंदुत्व सोडल्याचा आरोप करणा-या भाजपने आता हिंदुत्व सोडून द्यावे असे थेट आव्हानही ठाकरे यांनी यावेळी दिले.

ईदच्या निमित्ताने भाजपकडून ‘सौगात-ए-मोदी’चा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन यावर टीका केली. लोकसभेत शिवसेनेला मुस्लिम समाजाने मोठ्याप्रमाणावर मतदान केले आणि मुस्लिम समाज हा आमच्यासोबत येत असल्याचे समजताच यांचे डोळे पांढरे झाले होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याचा आरोप केला. मुस्लिम लोकांनी शिवसेनेला, उद्धव ठाकरेंना मत दिले तर हा ‘सत्ता जिहाद’ आहे असे बोलले गेले. पण आता ‘ईद’च्या निमित्ताने सौगात-ए-मोदी हा कार्यक्रम भाजपने हाती घेतला आहे.

वर्षभर मुस्लिम समाजाच्या नावाने शिमगा करायचा आणि निवडणुका आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची असा हा प्रकार आहे. यानिमित्ताने ३२ ते ३५ लाख मुस्­लिम कुटुंबीयांच्या घरी ३२ हजार भाजप कार्यकर्ते मुस्लिमांना अन्न देणार आहेत. हिंदुंना दंगलीसाठी वापरणार आणि हे मात्र सत्तेसाठी गळाभेटी घेत फिरणार, अशी चपराक लगावतानाच सौगातमुळे बोगस हिंदुत्ववाद्यांना चांगलीच पाचर बसलेली आहे असा टोलाही ठाकरेंनी लगावला. आमच्यावर हिंदुत्त्व सोडल्याचा आरोप करणा-यांनी आधी त्यांच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढावा. कारण त्यांचे त्यांचे ढोंग उघडे पडलेले आहे असेही ठाकरे म्हणाले.

नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनावरही उद्धव ठाकरेंनी जोरदार टिका केली. आताचा अर्थसंकल्प हा हताश आणि पाशवी बहुमत मिळवलेल्या अस्वस्थ सरकारने मांडलेला निरर्थक अर्थसंकल्प होता. ज्या गोष्टी निवडणूक जिंकण्यासाठी थापारुपाने मारल्या होत्या, त्याबद्दल कुठेही वाच्यता अर्थसंकल्पात नव्हती. ही अस्वस्थता, अपयश लपवणारे हे अधिवेशन होते, अशा शब्दात त्यांनी सरकारवर हल्ला चढवला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय झाला नाही. याला सत्तेचा माज म्हणतात, असा संताप व्यक्त करत राज्यपालांनी याप्रकरणात हस्तक्षेप करायला हवा. एखादी जागा लोकप्रतिनिधी शिवाय सहा महिन्यांपेक्षा जास्त रिक्त राहू शकत नाही, त्यासाठी निवडणूक घ्यावी लागते. त्याचप्रमाणे विरोधी पक्ष नेता हे सुद्धा पद रिकामे ठेवू शकत नाही. ते संविधानात्मक पद आहे, असे सांगतानाच संविधानात त्याबाबत अटीतटी, शर्थी किंवा कायदा, नियम असे काही लिहीलेले नाही आहे, असेही ते म्हणाले. विरोधी पक्ष नेता हा असायला पाहिजे आणि यापूर्वीचे दाखले सुद्धा आहेत. लोकसभेत कदाचित असू शकेल पण विधानसभेमध्ये असा कोणताही कायदा नसून, तसे असेल तर त्यांनी त्यांच्या वेगळ्या संविधानात लिहून द्यावे, असा टोलाही त्यांनी लगावला.

शिवसेना एकच, दुसरी गद्दार सेना
बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरण्यावरून उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना चिमटा काढला. सर्वाना बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली दुसरा पर्याय नाही हेच त्यातून दिसत आहे. गेल्या वेळेला या गद्दारांनी सुद्धा बाळासाहेबांचा फोटो वापरला तस सगळ्यांनाच बाळासाहेबांचा फोटो वापरण्याशिवाय काही पर्याय राहिलेला नाही असे ठाकरे म्हणाले. तसेच शिवसेना एकच आहे, तर दुसरी गद्दार सेना आहे, ती एसएनशी गद्दार सेना आहे असा टोलाही उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला लगावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR