करमाळा – शहरातील बसस्थानकाच्या लगत असलेल्या पंजाब वस्ताद चौकात पुणे रस्त्यावर बेकायदा टपऱ्यांमुळे पुणे आणि कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या रा.प. बसेसच्या ड्रायव्हरना मोठी कसरत करून बस काढाव्या लागतात. तसेच या रस्त्यावर ओटे, टपऱ्या आणि मांसल पक्षी विक्रीचे पिंजरे ठेवले आहेत. शिवाय या मार्गावरील रहिवाशांनी वरच्या मजल्यावर बेकायदा गॅल-यांमधुन बाथरूम बांधले असून सांडपाणी रस्त्यावरच काढले असल्याने पादचारी, दुचाकी वाहनधारक आणि चारचाकी वाहने यांवर हे पाणी सतत पडत असते. प्रशासनाने त्वरित हालचाल करून सदर अतिक्रमणे हटविण्याची मागणी सामान्यांतुन होत आहे.
सतत गजबजलेल्या या रस्त्यावर एसटी बसेस, खाजगी बसेस, मालवाहतूक ट्रक, ऊसवाहतूक करणारे ट्रॅक्टर इत्यादींची मोठी वर्दळ असते. करमाळा बसस्थानकातून कर्जत / पुणे कडे जाणाऱ्या बसेसना वळण घेताना येथील अतिक्रमणांमुळे अडथळा निर्माण होतो. त्यातच या रस्त्यावरील रहिवाशांच्या दुचाकी देखील लावलेल्या असतात. ड्रायव्हर ना मोठी कसरत करून बस मागे पुढे करत काढावी लागते.
तोपर्यंत येथे वाहनांची मोठी कोंडी होते तर कंडक्टरला बसमधून उतरून बसमागील वाहनधारकांना वाहने मागे घेण्याची विनंती करावी लागते. यातून बहुतेक वेळा भांडणाचे प्रसंग उद्भवतात. अशा वेळी अडकून पडलेल्या वाहनधारकांच्या अंगावर वरच्या मजल्यावरील सांडपाणी पडते. याबाबत या रहिवाशांकडे तक्रार केली असता याकडे दुर्लक्ष करून ते या प्रसंगाला चेष्टेने घेतात. रस्त्यावरच चिकनची दुकाने थाटल्याने नागरिकांना अस्वच्छता आणि दुर्गंधीचा सामना करावा लागतो. याउपर कहर म्हणजे येथे चालू असलेल्या बांधकामांचा राडारोडाही रस्त्याच्या लगतच टाकण्यात येत असल्याने सर्वांनाच याचा खूप त्रास होत आहे.
लवकरात लवकर याबाबत ठोस पावले उचलली गेली नाहीत तर जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा इशारा या प्रकाराचा त्रास सहन करणारांनी दिला आहे.