सोलापूर : शिक्षण उपसंचालकांनी जिल्ह्यातील टप्पा अनुदानावरील ६१ खासगी शाळांमधील २५२ शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडीच्या प्रस्तावात त्रुटी काढल्या होत्या. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून त्याची फेरपडताळणी सुरू असून ४३ शाळांमधील १५२ शिक्षकांचे प्रस्ताव पात्र झाले आहेत. आता ते प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी उपसंचालकांकडे पाठविले आहेत.
माध्यमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी . सरगर, . मुजावर व आंबेडकर यांच्या काळातील शिक्षक मान्यतांची नोंद कार्यालयातील दस्तऐवजात आढळत नाही. त्यामुळे संबंधितांच्या मान्यतांवरील स्वाक्षरी आपलीच आहे का, आपणच या कर्मचाऱ्यांना मान्यता दिली आहे का, यासंबंधीची विचारणा त्यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, . सरगर व . मुजावर यांच्या काळातील संबंधित कर्मचाऱ्यावर यापूर्वीच पोलिसांत एफआयआर दाखला झाला आहे. त्यामुळे आता केवळ . आंबेडकर यांच्या कार्यकाळातील काही मान्यतांची आवक- जावकमध्ये नोंदवह्यात नाही. त्यांनाही मान्यतेसंदर्भात विचारणा केली जाणार असून आवक-जावक नोंदवही गहाळ झाल्याप्रकरणी पुन्हा पोलिसांत फिर्याद दिली जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यानंतर त्या काळातील शालार्थ आयडीच्या प्रस्तावांवर निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, उपसंचालकांकडे पाठविलेल्या प्रस्तावात आणखी काही त्रुटी निघणार की थेट त्या सर्वांनाच शालार्थ आयडी मिळणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सांगोला विद्या मंदिर या शाळेतील नियुक्त शिक्षक टीईटी उत्तीर्ण नाही. त्यामुळे त्यांचा प्रस्ताव अपात्र ठरविला आहे.बिंदुनामावली व सेवकसंच प्रत न जोडल्याने सांगोल्यातील कै. वामनराव साहेब आदर्श विद्यालयाचा प्रस्ताव अपात्र ठरला आहे.नेमणूक अगोदर आणि बीएड उत्तीर्ण नंतर झालेल्या एका शिक्षकाचा प्रस्ताव अपात्र ठरला असून शरदचंद्रजी पवार विद्यालय, वाशिंबे, करमाळा या शाळेतील एक शिक्षक टीईटी उत्तीर्ण नसल्याने त्यांचाही प्रस्ताव अपात्र ठरला आहे.
माध्यमिक शिक्षण विभागाच्या प्रभारी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्या नेतृत्वाखाली शालार्थ आयडीच्या प्रस्तावातील त्रुटींची पडताळणी सुरू आहे. प्रत्येक प्रस्तावांची काटेकोर तपासणी केल्याच शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार संबंधित संस्थेकडून त्रुटींची पूर्तता करून घेतली जात आहे. त्यानुसार ५३ शाळांमधील १९६ कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्यातील आठ शाळांमधील ३८ प्रस्तावांवरील निर्णय पुढील आठवड्यातील विशेष कॅम्प आयोजित करून घेतला जाणार आहे.
टप्पा अनुदानावरील काही खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडी मिळाला आहे. आता आवक- जावक जुळत नसलेल्या व आवक- जावक नोंदवही सापडत नसलेल्या दहा- बारा शाळांमधील ६७ कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावांची पडताळणी करून त्रुटींची पूर्तता होणार आहे. शालार्थ आयडीच्या त्या प्रस्तावांसाठी पुढील आठवड्यात विशेष कॅम्प आयोजित केला जाणार आहे.