लखनौ : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुक २०२३ च्या जागा वाटपावरून काँग्रेससोबत मतभेद झाल्यानंतर समाजवादी पक्ष इंडिया आघाडीपासून वेगळे होणार असल्याची चर्चा होती. परंतु समाजवादी पक्ष अजूनही इंडिया आघाडीचा एक भाग असल्याचे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सोमवारी स्पष्ट केले. अखिलेश यादव यांनी सपा कार्यकर्त्यांसह सोमवारी लखनऊमध्ये पीडीएच्या (मागास, दलित आणि अल्पसंख्याक) सायकल मार्चला सुरुवात केली.
यादरम्यान अखिलेश यादव यांनी माध्यमांना सांगितले की, भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) पराभूत करण्यासाठी इंडिया आघाडी स्थापन करण्यात आली आहे. ‘पीडीए’ ही पक्षाची रणनीती आहे, मी यापूर्वीही हे म्हटलेले आहे. पीडीएच्या यात्रेत सर्वांचा सहभाग आहे, त्यापासून दूर राहणारा कोणीही नाही. आपण मागासलेले लोक, दलित अल्पसंख्याक बांधवांबद्दल बोलत आहोत. ही यात्रा भारतीय जनता पक्षाचा पर्दाफाश करत आहे, असे ते म्हणाले.
या महिन्यात मध्य प्रदेश निवडणुकीत उमेदवार उभे करण्यावरून काँग्रेस आणि समाजवादी पक्षामध्ये तणाव वाढला होता. अखिलेश यादव म्हणाले होते की, “काँग्रेस नेत्यांनी आम्हाला बोलावले, संपूर्ण आकडेवारी पाहिली आणि आम्ही सपाला ६ जागांवर विचार करू असे आश्वासन दिले, परंतु जेव्हा जागा जाहीर झाल्या तेव्हा सपाचा विचार करण्यात आला नाही. अखिलेश म्हणाले होते की, विधानसभा स्तरावर इंडिया आघाडीची कोणतीही युती होणार नाही, हे मला आधी कळले असते तर आम्ही त्यांना भेटायला कधीच गेलो नसतो. सपाला जी वागणूक मिळाली, येत्या काळात त्यांनाही (काँग्रेस) तीच वागणूक मिळेल, असे ते म्हणाले होते.