नवी दिल्ली : भारतीयांमध्ये हवाई प्रवासाची क्रेझ वाढत आहे. देशांतर्गत विमान कंपन्यांनी हवाई भाड्यात वाढ केली आहे. तरीदेखील प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. डीजीसीएने जारी केलेल्या एका आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये देशात हवाई प्रवास करणाऱ्यांची संख्या ११ टक्क्यांनी वाढली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने गुरुवारी (७ डिसेंबर) लोकसभेत सांगितले की, गेल्या नऊ वर्षांत हवाई प्रवाशांची संख्या १४ कोटीपर्यंत वाढली आहे. तसेच २०२३ पर्यंत हा आकडा तीन पटीने वाढून ४२ कोटींवर जाण्याची शक्यता आहे.
नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, २०१४ नंतर नऊ वर्षांत हवाई प्रवाशांची संख्या ६ कोटींवरून १४ कोटी झाली आहे, जी २०३० पर्यंत ४२ कोटी होण्याची शक्यता आहे. देशात ‘उडान’ या योजनेंतर्गत ७६ विमानतळांवरून उड्डाणे सुरू करण्यात आली असून अल्पावधीत १ कोटी ३० लाख लोकांनी विमानाने प्रवास केल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
खासदार ई. टी. बशीर मोहम्मद यांनी सरकारला विचारले की, सुट्ट्या आणि सणासुदीच्या काळात विमान भाड्यात गगनाला भिडणारी वाढ रोखण्यासाठी सरकार हस्तक्षेप करणार का? असे त्यांनी विचारले. यावर केंद्रीय मंत्री म्हणाले की, नागरी विमान वाहतूक क्षेत्राची परिस्थिती समजून घेतली पाहिजे. हे हंगामी क्षेत्र आहे. ही (सीझनमध्ये वाढणारी भाडे) केवळ भारतापुरतीच नाही तर जागतिक घटना आहे आणि याचे एक कारण म्हणजे बिगर-हंगामी कालावधीत विमान कंपन्या तोटा सहन करतात.
१० पट जास्त भाडे
काँग्रेसचे खासदार के. सुरेश यांनी मागणी केली की, प्रवासी नागरिकांना सुट्ट्या आणि सणांच्या काळात १० पट जास्त भाडे द्यावे लागत आहे आणि सरकारने यावर नियंत्रण ठेवण्याची त्यांनी मागणी केली. याबाबत सरकारने म्हटले आहे की, सरकारने एअरलाइन्सना काही देशांच्या फ्लाइट्सची संख्या वाढवण्याची विनंती केली आहे आणि तसे झाल्यास भाडेवाढीला नक्कीच आळा बसेल.
दरवर्षी सुमारे ११ टक्के वाढ
डीजीसीएच्या एका अहवालानुसार, ७९ लाखांहून अधिक लोकांनी इंडिगो एअरलाइन्सचा वापर केला. ही कंपनी भारतीय बाजारपेठेत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. सप्टेंबरमध्ये कंपनीचा बाजारातील हिस्सा ६३.४ टक्के होता. देशातील हवाई वाहतूक क्षेत्र दरवर्षी सुमारे ११ टक्के दराने वाढत आहे. सप्टेंबरमध्ये या कंपन्यांनी अंदाजे १.२२ कोटी लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले होते.