पुणे : ‘माझ्यावर फेसबुकवर अश्लील कमेंट करण्यात आली. त्याबद्दल माझ्या बंधूंनी सायबर पोलिसांत तक्रार दिली होती. जे दोषी आढळले त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली आहे. माझी बदनामी करता म्हणून कारवाई होणे गरजेचे आहे. यात पदाचा गैरवापर येतोच कुठे, असा सवाल करत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी त्यांच्यावरील पदाचा गैर वापर केला असल्याच्या आरोपावर स्पष्टीकरण दिले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर अश्लील कमेंट केल्याबद्दल पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींवर कारवाई केली होती. ही कारवाई करण्यासाठी रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक प्रदीप कणसे यांनी केला.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर अश्लील पोस्ट टाकून त्यांची जनमानसात बदनामी केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एक आरोपी मानसिक रुग्ण असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते.
आपल्या आरोपात कणसे म्हणाले, वैचारिक भूमिकेला विरोध केला म्हणून कायद्याचा गैरवापर करत पोलिस चाकणकर यांनी प्रशासनाकडून चौकशीसाठी नोटीस पाठवली. माध्यमांपर्यंत पोलिसांनी चुकीची माहिती पाठवून नाहक सामाजिक बदनामी केली, असेही ते म्हणाले.