नवी दिल्ली : भारतीय संघाचा नवोदित लेगस्पीन गोलंदाज रवी बिष्णोई याने आयसीसीच्या ताज्या टी-२० गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याने श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा व अफगाणिस्तानचा रशीद खान यांना मागे टाकत हे स्थान मिळवले आहे.
भारतीय संघाने मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत ४-१असा विजय मिळवला होता. या मालिकेत बिष्णोईने पाच सामने खेळताना ९ गडी बाद केले. त्याने या मालिकेत केलेल्या सरस कामगिरीमुळेच त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवडही करण्यात आली होती.
आता क्रमवारीतही अव्वलस्थानी झेप घेत आपला दर्जा सिद्ध केला आहे. आजवर अनिल कुंबळेनंतर आयसीसीच्या क्रमवारीत एकदम अव्वल स्थान गाठणारा बिष्णोई भारताचा पहिलाच लेगस्पीन गोलंदाज ठरला आहे.
रवी बिश्नोईच्या खात्यात आता ६९९ गुण आहेत. तो राशिद खानपेक्षा ७ रेटिंग गुणांनी पुढे गेला आहे. या यादीत श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा तिस-या क्रमांकावर, आदिल रशीद चौथ्या क्रमांकावर आणि महिश तीक्ष्ना पाचव्या स्थानावर आहे. म्हणजेच टी-२० आंतरराष्ट्रीय गोलंदाजांच्या क्रमवारीत फिरकीपटू अव्वल-५ स्थानांवर आहेत.
रवी बिश्नोईने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या फिरकीपटूने फेब्रुवारी २०२२ मध्ये ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. पहिल्याच सामन्यात तो ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला. त्याने १७ धावा देऊन दोन बळी घेतले होते.
बिश्नोईने आतापर्यंत २१ सामने खेळले असून १७.३८ च्या गोलंदाजीची सरासरी आणि ७.१४ च्या इकॉनॉमी रेटने एकूण ३४ बळी घेतले आहेत. त्याचा गोलंदाजीचा स्ट्राईक रेट १४.५ आहे. म्हणजेच त्याने प्रत्येक १५ व्या चेंडूवर एक विकेट घेतली आहे.