28.4 C
Latur
Friday, April 4, 2025
Homeमहाराष्ट्रआता राज्यात कुठूनही करता येणार घराची नोंदणी

आता राज्यात कुठूनही करता येणार घराची नोंदणी

मुंबई : राज्यात कुठेही बसून कुठल्याही जिल्ह्यातील घरांची नोंदणी करता येईल. ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन असेल. याबाबतची घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. महायुती सरकार राज्यात १ मे पासून ‘एक राज्य एक नोंदणी’ ही पद्धत सुरू करणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, घर खरेदी-विक्री करतेवेळी नोंदणीसाठी सरकारी कार्यालयात जावे लागते. तिथे अनेक हेलपाटे मारावे लागतात. नोंदणी करताना मध्ये दलालांचा अडथळा असतो. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शी व गतिमान सरकारच्या १०० दिवसांचा कार्यक्रम दिला होता, त्याअंतर्गत महसूल खात्याच्या मुद्रांक निरीक्षकांनी व महानिरीक्षकांनी एक चांगला उपक्रम पुढे आणला आहे. ‘एक राज्य एक नोंदणी’ अशी पद्धत आपलं सरकार सुरू करत आहे. त्याअंतर्गत राज्यातील कुठलीही नोंदणी, मुद्रांक नोंदणी घरी बसून करता येणार आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

पुण्यात बसून नागपुरातील घराची, मुंबईत बसून पुण्यातील घराची नोंदणी करता येईल. ही सगळी फेसलेस प्रक्रिया असेल. तुमचे आधार कार्ड व आयकर दस्तऐवजांच्या मदतीने तुम्ही फेसलेस नोंदणी करू शकता. ऑनलाईन मुद्रांक नोंदणी व ‘एक राज्य एक नोंदणी’ प्रक्रिया आपण १ मेपासून सुरू करत आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल इंडिया, डिजिटल महाराष्ट्रचा संकल्प केला आहे. आमचं सरकार त्यावर काम करत आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

डिजिटल स्वाक्षरी असणार अनिवार्य
कागदपत्रांमध्ये कोणतीही त्रुटी नसल्यास, दस्तऐवजावर विभागाचा अधिकारी डिजिटल स्वाक्षरी करील. सुरक्षिततेच्या उपायासाठी, फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या पडताळणीद्वारे ओळख अनिवार्य केली जाईल. तसेच, नागरिकांना डिजिटल स्वाक्षरीने दस्त सादर करणे अनिवार्य करण्यात येईल, अशी माहितीही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR