फ्लोरिडा : वृत्तसंस्था
स्पेसएक्स कंपनीने आपल्या पहिल्या व्यावसायिक मोहीमेचे यशस्वी प्रक्षेपण केले. या अंतराळ मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे या यानातून पहिल्यांदाच एका अब्जाधिशाला सफर करण्यासाठी अंतराळात पाठवण्यात आले आहे. हे यान पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांच्या वरून प्रदक्षिणा घालणार असून अंतराळ मोहिमांमध्ये हा मार्ग पहिल्यांदाच वापरला जाणार आहे.
फ्लोरिडातील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून रात्री ९.४६ मिनिटांनी फ्रॅम २ नावाच्या मोहिमेंतर्गत हे यान प्रक्षेपित करण्यात आले. ३ ते ५ दिवस हे यान अंतराळात राहील. माल्टामध्ये राहणारे चिनी वंशाचे असलेले चुन वांग असे या प्रवास करणा-या अब्जाधिशाचे नाव आहे. या प्रवासासाठी स्पेसएक्सला त्यांनी अब्जावधीची रक्कम दिली आहे. त्यांच्या बरोबर आणखी तीन सहकारी या यानातून प्रवास करणार आहेत. नॉर्वेजियन चित्रपट दिग्दर्शक जानिके मिकेलसेन, जर्मनीतील रोबोटिक्स संशोधक राबेया रॉग आणि ऑस्ट्रेलियन साहसी एरिक फिलिप्स. हे वांग यांचे सहकारी असणार आहेत.
फ्रॅम २ मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे हे यान प्रतितास २८ हजार किलोमिटर इतक्या वेगाने आपल्या कक्षेत पोहचले आहे. या यानाला त्याच्या कक्षेत पोहचवण्यासाठी स्पेसएक्सच्या फाल्कन ९ रॉकेटचा वापर केला गेला. लाँच झाल्यानंतर हे रॉकेट दक्षिणेकडे झेपावले. दक्षिण ध्रुवापासून उत्तर ध्रुवाकडे असा त्याचा प्रवास असणार आहे. सर्व चार अंतराळयात्री पहिल्यांदाच अवकाश प्रवास करत आहेत.
अंतराळात काढणार एक्स-रे
या मोहिमेतंर्गत मानावाच्या शरीरावर अंतरिक्ष प्रवासाचा होणा-या परिणामाचा अभ्यास केला जाईल तर कमी गुरुत्वाकर्षणाचा काय परिणाम मानवाच्या शरीरावर होतो यावरही संशोधन होईल. तसेच अंतराळात पहिल्यांदाच एक्स-रे काढला जाईल यातून सुक्ष्म गुरुत्वाकर्षणामुळे मानाच्या हाडे व स्नायूंवर काय परिणाम होतो याचा अभ्यास होईल व्यायामाचा अभ्यास या मोहिमेतील एक प्रयोग असणार आहे. या प्रयोगातून अंतराळात जास्त वेळ घालवावा लागला तर स्नायू व हाडे यांच्यावर काय परिणाम होतो व व्यायामाने त्यामध्ये कसा फरक पडतो याचा अभ्यास या प्रयोगातून होणार आहे.
अंतराळात उगवणार मशरुम
या मोहिमेंतर्गत एक प्रयोग आहे, ज्यामध्ये अंतराळातील वातावरणात मशरुम कसे उगवता येतील याची पाहणी केली जाईल. यातून अधिक दिवसांच्या मोहिमेमध्ये अंतराळयात्रींना खाद्यपदार्थ तयार करणे व ते टिकवणे यांची अधिक माहिती मिळेल. तसेच हे अंतराळयात्री जेंव्हा ड्रॅगन यानातून पृथ्वीवर परत येतील तेव्हा ते कोणत्याही मदतीविना यानातून बाहेर कसे येतील याचा अभ्यास केला जाईल. ज्याद्वारे भविष्यातील योजनासाठी याचा फायदा होईल.