इस्लामाबाद : वृत्तसंस्था
अफगाण नागरिकांविरोधात पाकिस्तान सरकारने मोठी कारवाई सुरू केली आहे. शेकडो घुसखोर अफगाणी नागरिकांना अटक करण्यात आली असून त्यांना प्रत्यार्पणासाठी छावण्यांमध्ये पाठवण्यात आले आहे. छापे टाकून बेकायदा अफगाणींना ताब्यात घेतले जात आहे. त्यांना निर्वासितांच्या छावण्यांमध्ये पाठवले जात आहे. त्यानंतर तोरखम सीमेवरून त्यांना अफगाणिस्तानात परत पाठवण्यात येणार आहे.
३१ मार्चपर्यंत स्वेच्छेने देश सोडण्याच्या शेवटच्या तारखेनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानने बेकायदा राहणा-या अफगाणी नागरिकांवर कारवाई सुरू केली आहे. अफगाणी नागरिक कार्ड धारकांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. या निर्देशानुसार, जर एखादा अफगाणी गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील असल्याचे आढळले तर संपूर्ण कुटुंबाने देश सोडला पाहिजे.
तालिबान सरकारने पाकिस्तानला प्रत्यार्पणाची प्रक्रिया लांबणीवर टाकण्याची विनंती केली होती. परंतु इस्लामाबादने त्याकडे दुर्लक्ष केले. अफगाणिस्तानने म्हटले आहे की, पाकिस्तान वैध कार्डधारकांनाही अनिश्चिततेत ढकलत आहे.
पाकिस्तानमध्ये १३ लाखांहून अधिक अफगाणी नागरिक राहतात. यापैकी ७ लाखांहून अधिक खैबर पख्तुनख्वा (केपी) मध्ये आहेत. बलुचिस्तानमध्ये ३.१७ लाख, सिंधमध्ये ७४,११७ पंजाबमध्ये १.९३ लाख आणि इस्लामाबादमध्ये ४२,७१८ अफगाण निर्वासित आहेत. एका नियतकालिकाच्या अधिकृत आकडेवारीचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, १ एप्रिलपर्यंत एकूण ८,८६,२४२ कागदपत्रे नसलेल्या घुसखोर अफगाणी नागरिकांनी पाकिस्तान सोडले आहे.