वर्धा : प्रतिनिधी
वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील मांडगावमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. आपल्या कुटुंबासह वर्ध्याकडे कारने येत असलेल्या पोलिस कर्मचा-याच्या गाडीला हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
पोलिस कर्मचा-याचे संपूर्ण कुटुंब या अपघातात मृत्युमुखी पडले. वर्ध्याच्या तरोडानजीक हा अपघात झाला. पती-पत्नी आणि दोन मुलं असे चौघे जण अपघातात ठार झाले. पोलिस कुटुंब मांडगाव येथून वर्ध्याकडे येत असताना कारची टँकरला धडक बसली.
रस्त्यावर रानडुक्कर आडवे आल्याने तरोडा गावाजवळ कार अनियंत्रित झाली. त्यामुळे समोरून येणा-या डिझेल टँकरला या गाडीची टक्कर झाली आहे. यात पोलिस कर्मचारी प्रशांत वैद्य यांच्या पत्नी प्रियंका आणि त्यांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.
तर प्रशांत वैद्य व मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची मोठी घटना घडली आहे. दुर्दैवाने यात तीन वर्षांचा मुलगा तर पाच वर्षांच्या मुलीचाही मृतकांमध्ये समावेश आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.