30.5 C
Latur
Saturday, April 19, 2025
Homeमहाराष्ट्रभूमाफीयांकडून शेतक-यांची फसवणूक, एसआयटीची नेमणूक

भूमाफीयांकडून शेतक-यांची फसवणूक, एसआयटीची नेमणूक

महसूलमंत्र्यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्याच्या राजगुरुनगर तालुक्यातील शेतक-यांची भूमाफीयांकडून फसवणूक झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता विशेष तपास पथकाची (एसआयटी) नेमण्याबाबत मुख्यमंर्त्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती मंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिली.

राजगुरुनगर तालुक्यातील शेतक-यांची पोपट मारुती घनवट व इतरांकडून फसवणूक झाल्याबाबत चेतन राजेंद्र चिखले यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह संबंधित शेतकरी यावेळी उपस्थित होते. तर, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आणि संबंधित अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

राजगुरुनगर तालुक्यातील पाईट या गावासह पोपट घनवट यांची विविध नावांनी तसेच कुटुंबियांच्या नावांनी अन्य ठिकाणी सुद्धा खरेदी केलेली जमीन आहे. त्यांनी स्थानिक शेतक-यांच्या जमिनी घेऊन शेतक-यांविरुद्धच अनेक तक्रारी दाखल केलेल्या आहेत. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी श्रीमती दमानिया यांनी यावेळी केली. जिल्हाधिकारी पुणे यांनी घनवट यांच्या नावे असलेल्या जमिनींची चौकशी केली आहे.

तथापि त्यांच्या जमिनी जिल्हाधिकारी यांच्या कार्यक्षेत्राबाहेर असण्याची सुद्धा शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे जमाबंदी आयुक्तांच्या माध्यमातून घनवट यांची राज्यात किती ठिकाणी आणि निवासी, कृषी, औद्योगिक आदी किती प्रकारच्या जमिनी असतील याबाबत त्याचप्रमाणे यासाठी आर्थिक व्यवहार कसा झाला याबाबतही चौकशी होणे आवश्यक आहे. या चौकशीची व्याप्ती कशी असावी याबाबत विभागाने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देऊन मंत्री बावनकुळे यांनी या प्रकरणी एसआयटी नेमण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे यावेळी सांगितले. पुणे जिल्हाधिकारी डूडी यांनी याप्रकरणी आतापर्यंत केलेल्या चौकशीनुसार घनवट यांच्या नावे असलेल्या जमिनीबाबतची उपलब्ध झालेली माहिती यावेळी सादर केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR