मुंबई : प्रतिनिधी
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाचा पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पाण्याची कमी जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांची तहान भागवण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील टँकरचा आकडा दोनशे पार गेला आहे.
राज्यात एकूण १४ जिल्ह्यांमधील ७८४ गावे-वाड्यांवर एकूण २२३ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. सर्वाधिक ६५ टँकर पुणे विभागात सुरू असून, सर्वाधिक ४० टँकर सातारा जिल्ह्यात सुरू आहेत. विशेष म्हणजे राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात देखील झपाट्याने घट होत आहे.
राज्यातील २ हजार ५९९ लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांत ४३.६७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी काळात पाणी प्रश्न गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या पावसाळ्यात चांगला पाऊस झाला. परिणामी, भूजल पातळीत वाढ झाली होती. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा काही प्रमाणात कमी होण्याची चिन्हे आहेत. मात्र काही ठिकाणी कमी झालेला पाऊस व अधिक पाण्याचा उपसा यामुळे काही गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट उभे राहू लागले आहे. गेल्या महिन्यापासून उन्हाच्या झळा वाढल्याने पाणीटंचाईची समस्या गावांत व वाड्या-वस्त्यावर वाढू लागली आहे. नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा व्हावा म्हणून शासनाच्या माध्यमातून दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. यंदाही टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून फेब्रुवारीपासून टँकरला सुरुवात झाली आहे.
सर्वाधिक टँकर सातारा जिल्ह्यात
राज्यात पाणीटंचाईची चाहूल आतापासूनच जाणवायला सुरुवात झाली. राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. एप्रिलच्या सुरुवातीलाच राज्यातील टँकरचा आकडा शंभरीपार गेला आहे. पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात २२३ टँकरनी पाणीपुरवठा सुरू आहे. ज्यात सर्वाधिक टँकर सातारा जिल्ह्यात सुरू आहेत.
मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा
जायकवाडी : ४९.८६ टक्के
निम्न दुधना : ४२.०७ टक्के
येलदरी : ५९.३५ टक्के
सिद्धेश्वर : ६१.१० टक्के
माजलगाव : ३८.१३ टक्के
मांजरा : ४२.७४ टक्के
पैनगंगा : ५७.८१ टक्के
मनार : ५०.६३ टक्के
निम्न तेरणा : ६२.७१ टक्के
विष्णुपुरी : ३९.८७ टक्के
सीना-कोळेगाव : १८.५१ टक्के