मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ९ एप्रिल रोजी अकासा एअरच्या मुंबईहून दिल्लीला जाणा-या विमानावर मधमाश्यांनी हल्ला केला. यावेळी मधमाश्यांच्या एका मोठ्या थव्याने विमानावर हल्ला चढवला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. विमानतळावरील क्विक रिस्पॉन्स टीमने तातडीने कार्यवाही केली. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.
अकासा एअरचे मुंबईहून दिल्लीला जाणारे विमान वे नंबर ए१ वर थांबले होते. याच दरम्यान अचानक मोठ्या संख्येने मधमाश्या जमा होऊ लागल्या. काही क्षणातच संपूर्ण विमानाला मधमाश्यांनी वेढले. यामुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. यानंतर विमानतळावरील क्विक रिस्पॉन्स टीमला घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या टीमने सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतींचा वापर करून मधमाशांना विमानापासून हटवले. त्यांच्या या त्वरित प्रतिसादाने मोठा अनर्थ टळला.
या घटनेमुळे विमानाचे वेळापत्रक विस्कळीत झाले. मधमाश्यांच्या हल्ल्यानंतर प्रशासनाने आवश्यक तपासणी केल्या. या तपासणीनंतर या विमानाला दिल्लीकडे प्रस्थान करण्याची परवानगी मिळाली. या घटनेत कोणतीही व्यक्ती जखमी झालेली नाही, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.