लातूर : प्रतिनिधी
प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत, विकासाची कास धरलेल्या, लातूर, धाराशिवसह मराठवाड्यात नव्याने उघड झालेले अमली पदार्थाचे कनेक्शन ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचे स्पष्ट करून पोलीस यंत्रणेने विशेष मोहीम राबवून या व्यवसायाची पाळे-मुळे उखडून टाकावीत, अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी या संदर्भाने म्हटले आहे की, शिक्षण, उद्योग, व्यापार, कृषी, सहकार आणि आरोग्य सेवेचे केंद्र म्हणून नावारुपाला येत असलेल्या लातूर जिल्ह्यातील काही लोक अमली पदार्थ निर्मिती तसेच विक्रीच्या प्रक्रियेत गुंतल्याची धक्कादायक बाब नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकाराने मन सुन्न झाले असून, राज्यातील पोलीस यंत्रणा नेमके काय करीत आहे? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे, अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीतही, जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर मराठवाड्यातील जनता प्रगतीच्या वाटा शोधण्याचा प्रयत्न करीत असताना अलीकडच्या काळात, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात चुकीच्या प्रवृत्तीचा प्रवेश होऊन अवैध व्यवसाय वाढू लागले आहेत.
मुंबई, पुणे, नाशिक, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर येथे अमली पदार्थांच्या व्यवसायाचे कनेक्शन उघड झाल्यानंतर, त्याचे लोण आता बीड, धाराशिव, लातूरपर्यंत येऊन पोहोचले आहे. सध्या तुळजापूरचे अमली पदार्थ संदर्भातील प्रकरण गाजत असतानाच आता लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात अतिदुर्गम भागात रोहिणा येथे एमडी ड्रग्स निर्मितीचा अवैध उद्योग सुरु असल्याचे उघड झाले आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे ठाणे जिल्ह्यात पोलीस म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचा-याने आपल्या गावात ड्रग्स निर्मितीचा व्यवसाय उभारल्याचे समोर आले आहे. अमली पदार्थाच्या महाभयंकर व्यवसायाचा तुळजापूरसारखे तीर्थक्षेत्र आणि लातूरसारख्या शैक्षणिक केंद्राशी संपर्क येणे ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र शासन आणि गृह विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन विशेष मोहिमेद्वारे अशा अवैध व्यवसायाची पाळेमुळे उखडून टाकणे आवश्यक बनले असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. अमली पदार्थाचा हा व्यवसाय कोण करते आहे याचा शोध घ्यावा, त्यांच्या पाठीशी कोण लोक आहेत याचाही छडा लावावा आणि या सर्वावर कडक स्वरूपाची कार्यवाही करावी असेही त्यांनी म्हटले आहे.