बंगळूरू : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलच्या १८ व्या मोसमातील २४ व्या सामन्यात घरच्या मैदानात खेळताना दिल्ली कॅपिटल्ससमोर १६४ धावांचे आव्हान ठेवले आहे. आरसीबीने २० ओव्हरमध्ये ७ विकेट्स गमावून १६३ धावा केल्या. आरसीबीसाठी फिलिप सॉल्ट आणि टीम डेव्हिड या दोघांनी सर्वाधिक ३७ धावांची खेळी केली. टीम डेव्हिड याने फिनीशिंग टच दिला, ज्यामुळे आरसीबी दिल्लीसमोर सन्मानजनक आव्हान ठेवण्यात यशस्वी ठरली. तर त्या दरम्यान विराट कोहली कर्णधार रजत पाटीदार या दोघांनी छोटेखानी मात्र महत्त्वाची खेळी केली.
आरसीबीच्या फिलीप सॉल्ट आणि विराट कोहली या सलामी जोडीने कडक सुरुवात केली. या दोघांनी जोरदार फटकेबाजी करत दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई केली. मात्र फिलीप सॉल्ट रन आऊट झाला आणि सर्वच गणित बिघडले. आरसीबीने ६१ धावावंर पहिली विकेट गमावली. सॉल्टने १७ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या. इथून आरसीबीचा डाव गडगडला आणि दिल्लीने सामन्यात कमबॅक केले. आरसीबीला पहिल्या विकेटनंतर कमबॅक करता आलंच नाही. दिल्लीने आरसीबीला ठराविक अंतराने झटके दिले, ज्यामुळे आरसीबीला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.