वंगळूरू : दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलमध्ये सलग चौथा विजय मिळवला असून गुरुवारी संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ६ गडी राखून पराभव केला. दिल्लीकडून केएल राहुलने सामना जिंकणा-या ९३ धावा केल्या. कुलदीप यादव आणि विपराज निगम यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
दिल्लीने चिन्नास्वामी स्टेडियमवर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरूने ७ विकेट गमावून १६३ धावा केल्या. दिल्लीने १७.५ षटकांत केवळ ४ गडी गमावून लक्ष्य गाठले. बंगळुरूकडून भुवनेश्वर कुमारने २ विकेट्स घेतल्या. टिम डेव्हिड आणि फिल सॉल्ट यांनी ३७-३७ धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सेट केलेल्या १६४ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाने आघाडीच्या विकेट गमावल्यावर लोकेश राहुलने ३७ चेंडूत अर्धशतक साजरे केले.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील केएल राहुलचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले. दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील १५ षटकांत त्याने गियर बदलून केलेली खेळी त्याचा क्लास दाखवणारी होती. १४ व्या षटकांत दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने ४ बाद ९९ धावा केल्या होत्या.
पावसाचे संकेत दिसत असताना डकवर्थ लुईस प्रमाणे १५ षटकांत दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला ११५ धावा करायच्या होत्या. जोश हेजलवूड घेऊन आलेल्या १५ व्या षटकात केएल राहुलनं दोन चौकार आणि एका षटकारासह आधी हे टार्गेट पार करत दिल्ली कॅपिटल्सला मोठा दिलासा दिला. त्याचा या षटकात दिसलेला तोरा परिस्थितीनुसार खेळण्यासाठी एकदम सक्षम असल्याची झलक दाखवून देणारा होता. सामन्यात पावसाचा व्यत्यय आला नाही. पण लोकेश राहुल विराटच्या आरसीबीच्या विजयाआड आला. त्याने सिक्सर मारत संघाला मॅच जिंकूनही दिली.