पुणे : राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे. आगामी तीन दिवस विदर्भात पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. उत्तर आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात सध्या पावसाचा कोणताही अलर्ट नाही. या भागात उष्णतेची लाट असणार आहे. राज्यातील इतर भागात उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव असणार आहे. कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
विदर्भात ११, १२ व १३ तारखेलाही पाऊस बरसणार आहे. गोंदिया जिल्ह्यासाठी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुणे येथील निवृत्त हवामान शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, आता पुढील २-३ दिवस उष्णतेची लाट विदर्भात कमी होणार आहे. पुढील ७२ तासांत अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे शहरात दुपारी अंशत: ढगाळ हवामान राहणार आहे. चार दिवसांच्या उष्णतेच्या झळांनंतर नाशिकमध्ये आजपासून तापमानात घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ४१ अंशांवर गेलेला पारा आता दररोज एक अंशाने कमी होण्याची शक्यता आहे.
२ दिवस धोक्याचे
हवामान खात्याचा अंदाज आहे की पुढील २४ ते ४८ तासांत हवामानातील बदल सुरूच राहणार आहे. अनेक ठिकाणी जोरदार वारे वाहतील आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवार आणि रविवारी जोरदार वारे आणि पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.