मुंबई : राज्यात २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (एचएसआरपी) बसविण्याचा आदेश सरकारने काढला आहे. परंतु, मुंबई महानगर प्रदेशात एचएसआरपी बसविण्यासाठी अपॉइंटमेंट मिळणे कठीण होत आहे. तसेच अपॉइंटमेंट मिळाली तरी नंबरप्लेट वेळेवर उपलब्ध होत नसल्याचे काही वाहनमालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांना फिटमेंट सेंटरच्या चकरा माराव्या लागत असून प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
राज्यातील अनेक ठिकाणी वाहनमालकांना बुकिंग करुनही एचएसआरपी नंबरप्लेट मिळत नाहीत. एजन्सीने पुरवलेल्या प्लेट्स वेळेवर केंद्रांवर पोहोचत नसल्याने फिटमेंट सेंटरवर वाहनचालकांना बराच वेळ वाट पाहावी लागते. सेंटरचालकांकडून अनेकदा त्यांना दुस-या दिवशी येण्यास सांगण्यात येते. एचएसआरपी बसविणा-या कर्मचा-यांच्या मते अनेक फिटमेंट सेंटर्सवर प्लेट्स वेळेवर मिळत नाहीत. या गोंधळामुळे हजारो वाहनमालकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या प्लेट्सचा योग्य प्रमाणात पुरवठा करण्याबाबत शासनाने त्वरित लक्ष देण्याची गरज असल्याचे मत वाहनमालकांनी व्यक्त केले आहे.
फिटमेंट सेंटरची नव्याने स्थापना : परिवहन आयुक्त
संबंधित फिटमेंट सेंटर नव्याने स्थापन झाले असल्याने प्लेट्सच्या पुरवठ्यावर परिणाम झाला होता. तथापि ज्यांचे नंबरप्लेट बसविण्याचे राहिले होते. त्यांचे फिटमेट आता करण्यात आल्याचे कंपनीकडून कळविण्यात आल्याची माहिती परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी सांगितले.
प्लेट उपलब्ध नसल्याने रिकामी परत
पालघर परिसरात अपॉइंटमेंटसाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत असल्याचे अनेक वाहनमालक सांगत आहेत. एजन्सीने फिटिंग सेंटरला एचएसआरपी प्लेट पोहोचवली नसल्यामुळे अनेकांना सेंटरवरून परतावे लागत आहे. १० दिवस झाल्यानंतर प्लेट बसवण्याची वेळ दिली जाते. मात्र फिटमेंट सेंटरवर त्या दिवशी गेल्यानंतर अनेकांना हात हलवत परत यावे लागत असल्याचे वाहनमालकांचे म्हणणे आहे.