सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना वेळेत ड्यूटीवर येणे आणि सुट्टीनंतर कार्यालयातून बाहेर पडणे बंधनकारक आहे. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत कोठे जेवण करायचे यासंदर्भात त्यांच्यावर कोणतेही बंधन नाही. परंतु, विलंबाने ड्यूटीवर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंद ठेवण्यासाठी प्रत्येक विभागात स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात आली आहे. सलग तीनवेळा विलंबाने येणाऱ्या कर्मचाऱ्याची एक दिवसाची बिनपगारी रजा नोंद केली जाते. आता प्रशासकीय बाब म्हणून स्वत: सीईओ विलंबाने येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवत आहेत. त्यामुळे बहुतेक कर्मचारी वेळेत ड्यूटीवर येत असल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील जवळपास ५५० लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांना यशदा मधील प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. १ ते १२ जानेवारी या काळात प्रशिक्षण संपल्यानंतर काही दिवसांत जानेवारीअखेर सर्वांचीच लेखी परीक्षा घेण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी संबंधित विभागप्रमुख व पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून (बीडीओ) प्रश्न मागवून त्यातून एक प्रश्नपत्रिका तयार केली जाणार आहे. लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांना त्यांची क्षमता विकसित करण्याची संधी मिळावी, प्रशासकीय कामकाज करताना त्यांना कोणत्याही अडचणी येवू नयेत म्हणून सर्वांनाच १ ते १२ जानेवारी दरम्यान प्रशिक्षण दिले जाणार आहे. यशदा, पुणे येथील तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून सर्व लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची तयारी सुरू आहे.
एकदा प्रशिक्षण दिल्यानंतर पुन्हा गरज भासल्यास आणखी एकदा प्रशिक्षण देण्याचीही प्रशासनाची तयारी आहे. प्रशिक्षणानंतर काही दिवस कर्मचाऱ्यांना परीक्षेच्या अभ्यासासाठी काही दिवसांचा वेळ दिला जाणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेतील प्रत्येक विभागप्रुखांकडून व पंचायत समित्यांमधील गटविकास अधिकाऱ्यांकडून परीक्षेसंदर्भातील प्रश्न मागवून घेतले जाणार आहेत. त्याचा प्रश्नसंच तयार करून मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे व सामान्य प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांची प्रश्नपत्रिका तयार केली जाईल. त्यानुसार परीक्षा पार पडेल असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
रे नगर येथील घरकूल प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ डिसेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येतील, असे सांगितले जात आहे. पंतप्रधानांचा दौरा झाल्यानंतर जिल्हा परिषदेतील लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडेल. सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर याठिकाणी प्रशिक्षण होणार आहे. त्यानंतर काही दिवसांतच परीक्षा होईल, तत्पूर्वी सर्वांना वेळापत्रक दिले जाणार आहे. परीक्षेच्या निकालानंतर कोणता कर्मचारी कोणत्या विभागात नेमला जाणार हे निश्चित होईल, असेही सांगितले जात आहे.