मुंबई : प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसीय महाराष्ट्र दौ-यावर आले होते. १२ एप्रिलला अमित शहा हे रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यानंतर १३ एप्रिल रोजी अमित शहा हे मुंबईहून भोपाळकडे रवाना झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शहा यांना एअरपोर्टवर सोडायला जातील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र एअरपोर्टवर सोडवायला शिंदे-फडणवीस नव्हे तर भाजप नेते मंगलप्रभात लोढा हे सहकुटुंब गेल्याचे दिसून आले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे १३ एप्रिल रोजी सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा देखील झाली. यानंतर अमित शहा हे भोपाळकडे रवाना झाले. यावेळी भाजप नेते मंगलप्रभात लोढा हे अमित शहा यांना भोपाळला सोडवायला गेल्याचे पाहायला मिळाले. एअरपोर्टवर जाताना गाडीत अमित शहा यांच्या मांडीवर एक छोटी मुलगी आणि मागे दोन छोट्या मुली आणि एक महिला बसली होती. हे कुटुंब मंगलप्रभात लोढा यांचे असल्याची माहिती मिळत आहे.
पडळकर यांनीही घेतली शहांची भेट
दरम्यान, अमित शहा यांच्या दौ-यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील त्यांची भेट घेतली आहे. मे महिन्यात अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण पडळकर यांनी अमित शहा यांना दिले आहे. तर अमित शहा यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे वचन दिल्याची माहिती गोपीचंद पडळकर यांनी एक्सवर पोस्ट करत दिली आहे.