36.5 C
Latur
Wednesday, April 16, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरधस, क्षीरसागर यांच्यावर ३९ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप

धस, क्षीरसागर यांच्यावर ३९ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप

बीड : बीड जिल्ह्यामध्ये २०१४ पूर्वीच्या काँग्रेस-आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्या सुरेश धस, तत्कालीन बीड जिल्हा परिषद शिक्षण सभापती संदीप क्षीरसागर आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला या तिघांनी शिक्षक आंतरजिल्हा बदलीमध्ये तब्बल ३९ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी केला आहे. या बदली प्रकरणात शिक्षकांकडून प्रत्येकी तीन लाख रुपये घेण्यात आले होते. १३०० हून अधिक शिक्षकांकडून पैसे घेऊन या बदल्या करण्यात आल्या होत्या, असा आरोपही सानप यांनी केला.

बीड येथे पत्रकारांशी संवाद साधताना सानप यांनी बीड जिल्ह्यात आतापर्यंत कधीही बिंदू नामावलीचा विषय आला नव्हता, मग १४ वर्षानंतर हा मुद्दा उपस्थित करत जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न का केला जातोय? असा असा सवाल सानप यांनी उपस्थित केला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील शासकीय कर्मचा-यांच्या नियुक्त्यांमध्ये बिंदू नामावलीचे पालन झाले की नाही? हे तपासण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. बीड जिल्ह्यात फोफावणारा जातियवाद रोखण्यासाठी बिंदू नामावलीचे तंतोतंत पालन केले जावे असा आग्रह सुरेश धस यांनी धरला होता.

यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीड जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, कर्मर्चा­यांची एक यादी सोशल मीडियावर व्हायरल केली होती. त्यावर एकाच समाजाचे लोक पदावर कसे काय? बिंदू नामावलिचा नियम बीड जिल्ह्यात लागू होतो की नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर अजित पवार यांनी या मुद्द्याची गंभीर दखल घेत बिंदू नामावलिनुसारच शासकीय कर्मचारी, अधिकारी यांच्या नियुक्ती आहेत का? हे तपासण्यासाठी समिती स्थापन केली होती.

त्यानंतर बीड जिल्ह्यात ख-या अर्थाने हा मुद्दा चर्चेला आला. याच मुद्यावरून आता ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी २०१४ मधील आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रकरण पुढे करत आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांच्यावर थेट पैसे घेऊन तब्बल ३९ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या संदर्भात शिक्षक संघटनांना सोबत घेऊन लवकरच आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री यांची भेट घेणार असल्याचे सानप यांनी सांगितले.

१४ वर्षानंतर बीड जिल्हा परिषदेत बिंदू नामावलीचा प्रश्न उद्भवला आहे. ज्यावेळी आंतरजिल्हा बदल्या सुरू होत्या त्या काळात सर्व शिक्षकांनी बीड जिल्ह्यामध्ये आम्हाला परत यायचे आहे, अशी मागणी केली होती. त्यावेळी मंत्री असलेल्या सुरेश धस यांनी तत्कालीन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला, शिक्षण सभापती संदीप क्षीरसागर यांना हाताशी धरून शिक्षकांच्या भरत्या केल्या होत्या. तब्बल तेराशे शिक्षकांकडून प्रत्येकी तीन लाख रुपये घेण्यात आले होते. ही रक्कम ३९ कोटी रुपयांच्या वर जाते, असा दावाही सानप यांनी पत्रकार परिषदेत केला. हे सर्व पैसे सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि अब्दुल्ला यांच्या खिशात गेले असा थेट आरोपी त्यांनी केला.

बिंदू नामावलीच्या माध्यमातून एका समाजाला टार्गेट करण्याची काम सुरेश धस यांच्याकडून केली जात आहे. २०१४ ते २०२४ दरम्यान बिंदू नामावलिचा प्रश्न कुठेही आला नाहीस मग आताच तो का निर्माण केला जात आहे असा सवाल करत धस हे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत असल्याचे सानप म्हणाले. दरम्यान सुरेश धस यांनी पंकजा मुंडे मंत्री असताना या भरत्या झाल्या होत्या, असा दावा केला होता. सानप यांनी तो दावाही खोडून काढला. आघाडी सरकार राज्यात सत्तेवर होते आणि त्या मंत्रिमंडळात सुरेश धस मंत्री होते. त्यामुळे पंकजा मुंडे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असे सानप यांनी स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR