श्रीहरीकोटा : भारताच्या डीआरडीओने एक अमोघ असे शस्त्र तयार केले असून या शस्त्राने शत्रूची विमाने क्षेपणास्त्रे, ड्रोन हवेतल्या हवेतच नष्ट करणे शक्य होणार आहे. यामुळे देशाची संरक्षण सिद्धता वाढणार आहे.या प्रकारचे तंत्रज्ञान मिळविणारा भारत अमेरिका, चीन आणि रशियानंतरचा चौथा देश आहे.
या नव्या शस्राची चाचणी डीआरडीओने अलिकडेच घेतली आहे.
डीआरडीओच्या या नव्या ३० किलोवॅट क्षमतेच्या लेसर-आधारित शस्त्र प्रणालीचा वापर करून स्थिर-विंग असलेली विमाने, क्षेपणास्त्रे आणि ग्रुप ड्रोन हवेतल्या हवेत नष्ट करता येणार आहेत, त्यामुळे देशाच्या संरक्षण तंत्रज्ञानातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे. आज तुम्ही जे पाहिले ते स्टार वॉर्स तंत्रज्ञानाच्या घटकांपैकी एक होते असे डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनी म्हटले आहे. माझ्या माहितीनुसार, अमेरिका, रशिया आणि चीनने याआधी ही क्षमता दाखवली आहे. इस्रायल देखील अशाच क्षमतांवर काम करीत आहे, मी म्हणेन की ही प्रणाली दाखवणारा भारत जगातील चौथा देश आहे असेही कामत यांनी म्हटले आहे.
भारत चौथ्या क्रमांकांचा देश
संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने(डीआरडीओ) हे लेझर आधारित शस्त्र(डीईडब्ल्यू) विकसित केले आहे, जे आता लष्करातील वापरासाठी उत्पादित आणि तैनातीसाठी सज्ज होणार आहे. या डीआरडीओच्या या कामगिरीने भारत अमेरिका, चीन आणि रशियासह प्रगत लेसर शस्त्र क्षमता असलेल्या देशांच्या उच्चभ्रू गटात भारताचा समावेश झाला आहे.
स्टार वॉर्स क्षमता मिळणार
या प्रयोगशाळेने इतर डीआरडीओ प्रयोगशाळा, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांशी साधलेला समन्वय साधून हे शस्र तयार केले आहे.ही तर प्रवासाची सुरुवात आहे. मला खात्री आहे की आपण लवकरच आपले ध्येय गाठू. आता आम्ही उच्च ऊर्जा मायक्रोवेव्ह, इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स सारख्या इतर उच्च ऊर्जा प्रणालींवर देखील काम करीत आहोत. आम्ही अशा अनेक तंत्रज्ञानावर काम करीत आहोत ज्यामुळे आपल्याला स्टार वॉर्स क्षमता मिळेल असे डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर कामत यांनी म्हटले आहे.
उपग्रह सिग्नल जॅम करण्याची ताकद
३० किलोवॅट क्षमतेची ही लेसर शस्र प्रणाली ५ किलोमीटरच्या परिसरात ड्रोन आणि हेलिकॉप्टरसारख्या हवाई हल्ल्यांच्या धोक्यांना तोंड देण्यासाठी डिझाईन केली आहे. या प्रणातील अत्यंत प्रगत इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षमता आहेत, ज्यामध्ये संप्रेषण आणि उपग्रह सिग्नल जॅम करण्याची देखील ताकद आहे. अचूक लक्ष्य वेध करण्यासाठी ही प्रणाली ३६०-डिग्री इलेक्ट्रो-ऑप्टिकल/इन्फ्रारेड(ईओ/आयआर) सेन्सरने सुसज्ज आहे आणि ती हवाई, रेल्वे, रस्ते किंवा समुद्राद्वारे वेगाने कुठेही नेऊन तैनात केली जाऊ शकते.