मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा याला भारतात आणण्यात यश आले आहे. अमेरिकेकडून त्याच्या प्रत्यार्पणाला हिरवा कंदिल मिळाल्यानंतर भारतीय पथकाने त्याला अमेरिकन ‘गल्फस्ट्रीम जी-५५०’ या विमानाने दिल्लीच्या पालम विमानतळावर आणले. त्यानंतर मूळचा पाकिस्तानी आणि नंतर कॅनडाचा नागरिक असलेल्या तहव्वूर राणा याला थेट राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) मुख्यालयात नेण्यात आले. यावेळी मुख्यालयाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारताकडे प्रत्यार्पण केल्यानंतर पाकिस्तानने आपले हात झटकले आहेत. राणाने गत दोन दशकांत त्याच्या पाकिस्तानी कागदपत्रांचे नूतनीकरण केलेले नाही. त्यामुळे तो कॅनेडियन नागरिक असल्याचे अगदी स्पष्ट आहे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने म्हटले आहे.
आता पाकिस्तानने हात झटकले असले तरी ‘सुंभ जळाला तरी पीळ कायम असतो’ हे त्यांच्या लक्षात यायला हवे. लक्षात आले असले तरी कांगावा करण्याचे प्रयत्न होतच असतात! दहशतवादी हल्ल्याचा मुख्य आरोपी तहव्वूर राणा याचे अमेरिकेहून भारतात पदार्पण होणे हे भारतासाठी मोठे यश आहे, अशी प्रतिक्रिया दहशतवादी हल्ल्यातून बचावलेल्या साक्षीदार देविका रोटावन यांनी दिली आहे. पाकिस्तानात लपून बसलेल्या इतर कटकारस्थान्यांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. २६/११ प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदार असलेल्या रोटावन यांनी न्यायालयात दहशतवादी कसाबची ओळख पटवून दिली होती. राणा याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.
अवघ्या ९ वर्षांच्या असताना देविका रोटावन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे झालेल्या गोळीबारात जखमी झाल्या होत्या. त्यांच्या पायाला गोळी लागली होती. वडील आणि भावासोबत पुण्याला जाण्यासाठी रोटावन प्लॅटफॉर्मवर रेल्वेची वाट पाहत असताना स्टेशनवर दहशतवादी हल्ला झाला होता. २६ नोव्हेंबर २००८ रोजी १० शस्त्रसज्ज पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर भीषण हल्ला केला होता. या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह किमान १९७ निष्पाप लोकांचे बळी गेले होते तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. मुंबई पोलिस व भारतीय सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांना ठार केले होते तर अजमल कसाब या एकमेव दहशतवाद्याला जिवंत पकडले होते. राणाचे प्रत्यार्पण हे हल्ल्यातील पीडित कुटुंबे आणि मुंबईसाठी न्याय व समाधान मिळवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. १६ वर्षांच्या लढ्यानंतर राणाचे प्रत्यार्पण झाले आहे. आता डेव्हिड हेडली आणि हाफीज सईद यांनाही भारतात आणून त्यांना शिक्षा दिली पाहिजे.
२००८ च्या मुंबई हल्ल्यातील सहभाग प्रकरणी राणा अमेरिकेत शिक्षा भोगत होता. मे २०२३ मध्ये राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेतील कोर्टाने मंजुरी दिली होती. त्या निर्णयाला राणाने अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात याचिकेद्वारे आव्हान दिले होते. ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली होती. राणा हा त्याचा मित्र डेव्हिड हेडली याच्यासह डेन्मार्कमध्ये मुंबईवर हल्ला घडवून आणण्याच्या योजना आखल्याच्या आरोपाखाली २०१३ मध्ये दोषी आढळला होता. अमेरिकन कोर्टाने त्याला १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. गत ४० वर्षांत भारतात अनेक दहशतवादी हल्ले झाले आणि त्या सर्वांचे कोणी ना कोणी मास्टरमाईंड असल्याचे सुरक्षा यंत्रणांच्या लक्षात आले. हे मास्टरमाईंड त्याच्या मास्टर प्लॅनप्रमाणे हल्ले घडवत आले परंतु त्यातल्या फारच थोड्यांना शिक्षा होऊ शकली. कारण या दहशतवादी मास्टरमाईंडना पकडण्याकरिता आवश्यक ते उपाय करता आले नाहीत. आता देखील राणाला भारतात आणल्याचा गाजावाजा होतो आहे. परंतु त्याला पकडण्याकरिता १५ वर्षांचा कालावधी लागला. भारतात हल्ले घडवायचे आणि परदेशात पळून जायचे हे प्रकार पूर्वीपासून होत आले आहेत.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांचा इतिहास पाहता सर्वप्रथम नाव येते ते दाऊद इब्राहिमचे. त्याने १२ मार्च १९९२ ला मुंबईत १२ बॉम्बस्फोट घडवले. हा भारतातला सर्वांत मोठा दहशतवादी कट होता. राणाविरुद्धचा खटला जलदगती कोर्टामध्ये चालवून त्याला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. नसता त्याला सांभाळण्यात विनाकारण मोठा खर्च करावा लागेल. हत्ती पोसण्यासारखा हा प्रकार होईल. दहशतवादाच्या आगीत भारत हा सर्वाधिक पोळलेला देश आहे. स्थानिक पातळीवर भारताने हा दहशतवाद संपुष्टात आणण्याच्या दिशेने कठोर पावले उचलली नाहीत म्हणूनच इतक्या मोठ्या प्रमाणावर हल्ले झाले. खरे तर संपूर्ण जगाने दहशतवादाविरुद्ध एकत्र यावे असे आवाहन भारताने वारंवार केले होते. पण अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हाच जगाला दहशतवादी हल्ल्यातील दाहकता लक्षात आली. तरीसुद्धा दहशतवादाचा झटका बसलेल्या अमेरिकेने राणासारख्या दहशतवाद्याचे प्रत्यार्पण करण्यासाठी विलंब लावला. कदाचित अमेरिकेला भारतातला दहशतवादी हल्ला फारसा महत्त्वाचा वाटला नसावा. भारताने यापासून योग्य धडा घेतला पाहिजे. २६/११च्या हल्ल्यामागे दाऊदचा अदृश्य हात होता. म्हणून त्यालाही भारतात आणून शिक्षा केली पाहिजे.
ते शक्य होत नसेल तर अमेरिकेने जसे लादेनला संपवले तसे दाऊदलाही संपवले पाहिजे. गत काही वर्षांत भारतातले हल्ले थांबलेले दिसत असले तरी अशा हल्ल्यांना सहानुभूती असणारी मानसिकता अजूनही कार्यरत आहे. छोटे-मोठे दंगे घडवण्यामागे तीच मानसिकता आहे. राणासारखा मास्टरमाईंड जरी हाताशी लागला तरी स्थानिक पातळीवर मदतीचा हात देणारे छुपे माईंड भरपूर आहेत. त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. काश्मीरमध्ये पोसला गेलेला दहशतवाद राजकारण्यांच्या छत्रछायेखाली पोसला गेलेला दहशतवाद होता. राणासारखा दहशतवादी पकडला जाऊ शकत असेल तर पाकिस्तानात बसून भारतातल्या घडामोडींचे सूत्रसंचालन करणा-या आणि अनेक वर्षे भारताला चकवा देणा-या मास्टरमाईंड दाऊद इब्राहिमचा हिशेब करण्याची वेळ आली आहे. समन्वय, सातत्याने प्रयत्न आणि सकारात्मक पाठपुरावा केला तर असाध्य ते साध्य होऊ शकते.