34.3 C
Latur
Friday, April 18, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात पुढच्या दोन दिवसांत अवकाळी पाऊस

राज्यात पुढच्या दोन दिवसांत अवकाळी पाऊस

अनेक ठिकाणी गारपिटीचा तडाखा हवामान विभागाचा इशारा!

पुणे : प्रतिनिधी
मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात कमाल तापमानाचा पारा १ ते २ अंश सेल्सिअसने उतरला आहे. मात्र, विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. पुढील एक ते दोन दिवसांत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, अकोला येथे ४२.४ सर्वाधिक तापमान नोंदविले गेले. तर, जळगाव, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात रविवारी गारासह अवकाळी पाऊस झाला.

पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. मात्र, राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेलाही वेग आला. त्यामुळे काही भागांत पावसाचा अंदाज आहे.

जळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक आदी भागांतील कमाल तापमानाचा पारा काहीसा उतरला. सोलापूर अद्यापही ४० अंशाच्या पुढेच आहे. पुढील दोन दिवस नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या भागांत पावसाचा अंदाज आहे.

जळगाव जिल्ह्यात रावेरनंतर चोपडा तालुक्यात रविवारी दुपारी दोन वाजता ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला, तर काही ठिकाणी गाराही पडल्या. गहू, केळी, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे.

सलग दुस-या दिवशी गारपीट
नाशिक जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये सलग दुस-या दिवशीही गारपीट झाल्याने उन्हाळ कांद्यासह द्राक्ष आणि गहू पिकांचे नुकसान झाले आहे. रविवारी येवला, निफाड आणि चांदवड तालुक्यांतील काही गावांना गारपिटीचा फटका बसला.

उत्तर महाराष्ट्रात दाणादाण
गेले दोन दिवस राज्यात झालेल्या हवामान बदलाचा फटका उत्तर महाराष्ट्राला बसला असून जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसाने पिकांची दाणादाण उडाली. अहिल्यानगरमधील अकोले तालुक्यात धामणगाव आवारी आणि परिसरात रविवारी दुपारी तासभर वादळासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR