पुणे : राष्ट्रीय संरक्षण अकादमीतर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत पुण्यातील ऋतुजा व-हाडे हिने मुलींमध्ये देशात पहिला क्रमांक पटकावला असून ऑल इंडिया रँक ३ मिळवत नवा इतिहास रचला आहे. तिचे वडील संदीप व-हाडे हे वेब डिझाइन प्राध्यापक असून आई जयश्री व-हाडे या गणिताच्या शिक्षिका आहेत. या यशाबद्दल सर्वच स्तरातून दोन्ही मैत्रिणींवर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.
एनडीए प्रवेश परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. केवळ ९० जागांसाठी सुमारे दीड लाख मुली रिंगणात उतरल्या होत्या. त्यात आपले वेगळेपण सिद्ध करत ऋतुजाने देशात अव्वल स्थान मिळविले. भारत सरकारने राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे दरवाजे मुलींसाठी उघडले तेव्हाच ऋतुजाने या क्षेत्रात झेप घेण्याचा निश्चय केला होता. जिद्द आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर तिने हे यश मिळविले आहे. यापूर्वी तिने विज्ञान ऑलिम्पियाड आणि राज्यस्तरीय गणित स्पर्धांमध्येदेखील उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तसेच ती एक प्रशिक्षित हार्मोनियमवादक आणि गायिकादेखील आहे.
ऋतुजाने या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करण्यासाठी दोन वर्ष कठोर परिश्रम घेतले. यात तिला वायटीए या अकॅडमीचे मार्गदर्शन लाभले. या अकॅडमीचे संस्थापक आणि तिचे मार्गदर्शक तेजस पाटील म्हणाले की, एनडीए परीक्षेत यश मिळवण्यासाठी अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. यात सुरुवातीला लेखी परीक्षा उत्तीर्ण होणे, त्यानंतर पाच दिवस चालणा-या तोंडी परीक्षेत यश संपादन करणे सोपे नाही. ऋतुजा ही प्रचंड मेहनती मुलगी असल्याने ती यात झेप घेऊ शकली. लेखी परीक्षेला सुमारे दीड लाख मुली होत्या, त्यापैकी १ हजार मुलींची तोंडी परीक्षेसाठी निवड झाली आणि त्यातून ९० मुली निवडण्यात आले.
त्यात ऋतुजाने देशात अव्वलस्थान बळकावत पुण्याची मान उंचावली आहे. या यशाबद्दल तिचे मनापासून अभिनंदन. सशस्त्र दलामध्ये सहभाग घेऊन देशाची सेवा करू इच्छिणा-या असंख्य मुलींसाठी ती प्रेरणास्थान ठरली आहे.