माळशिरस : दुधाला प्रतिलीटर ३४ रुपये दर निश्चित करा तसे न केल्यास जे दूध संघ शासकीय आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला द्यावेत. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून नाइलाजाने रस्त्यावर उतरून लढाई लढावी लागेल, असा इशारा तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
शासनाने दुधाच्या संदर्भामध्ये १४ जुलै २०२३ रोजी एक जीआर काढलेला होता. यात दूध नियंत्रण समितीने जाहीर केलेला ३४ रुपये प्रतिलीटर दूध देण्याच्या सूचना होत्या. या समितीची पुन्हा तीन महिन्यांनी बैठक होईल त्यावेळेस पुढील दुधाचे दर निश्चित होतील असे सांगण्यात आले होते. आतापर्यंत दूध दर नियंत्रण समितीची कोणतीही बैठक झालेली नसताना खासगी व सहकारी संस्थांनी प्रतिलीटर २७ ते २५ रुपये इतके दर केले आहेत.
त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. पशुखाद्याचे व जनावरांच्या चाऱ्याचे वाढलेले दर पाहता हा धंदा सध्या तोट्यात आला आहे. शासन एखादा निर्णय ज्यावेळेस करते त्यावेळी त्याची अंमलबजावणी करणे हे सर्व यंत्रणेचे काम असते. परंतु आज या संस्था कोणाच्याही दबावला भीक घालत नाही. जे संघ यापुढे दुधाला ३४ रुपये दर देणार नाहीत त्यांचे परवाने निलंबित करून ते संघ शासनाने ताब्यात घ्यावेत, असे निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी माढा लोकसभा अध्यक्ष कमलाकर माने-देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष मदनसिंह जाधव, युवा जिल्हा उपाध्यक्ष दत्ता भोसले, विधानसभा प्रमुख साहिल आतार, डॉ. धनंजय म्हेत्रे, ग्रामपंचायत सदस्य रणजित ठवरे, जब्बार आतार, शैलेश भाकरे, संजय भाकरे, सचिन बोरकर, मुसा शिंदे, दादा काळे, बंटी माने, शुभम माने, राजेश खरात, शिवाजी वाघमारे, गणेश वळकुंडे, मायाप्पा सुळे, विजय वाघबरे, किशोर गोरवे, संदीप कपने उपस्थित होते.