पुणे : माणुसकी हरवली का? असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. अपघातात एक पाय गमावलेला रुग्ण उपचारासाठी ससूनमध्ये दाखल झाला होता. उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले, मात्र रुग्णालयाकडून व्हीलचेअर तर दूरच, कुणी मदतीसुद्धा पुढे आले नाही. त्यामुळे रुग्णाला स्वत:च जमिनीवर सरपटत रुग्णालयाच्या वार्डमधून बाहेर पडावे लागले. याचा हृदयद्रावक व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
याआधीच आर्थिक अडचणींमुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ससून रुग्णालयातील ही घटना आरोग्य व्यवस्थेतील हलगर्जीपणाचे आणि अमानवतेचे चित्र पुन्हा समोर आणले आहे. व्हिलचेअरचा अभाव की निष्काळजीपणा? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. रुग्णावर उपचार झाले, पण रुग्णालय प्रशासनाने त्याला बाहेर जाण्यासाठी व्हिलचेअर उपलब्ध करून दिली नाही. हा रुग्ण एका पायाने अपंग असूनही त्याला जमिनीवर घासत घरी जावे लागले, हे पाहून नागरिक संतप्त झाले आहेत.
ससून सुधारणार नाही अशी तीव्र प्रतिक्रिया आता स्थानिकांकडून येत आहे. ससून रुग्णालयातील वारंवार घडणा-या या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ही माणसे आहेत की दानव? असा सवाल या व्हीडीओवर विचारण्यात येत आहे. आरोग्य प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे.