38.6 C
Latur
Wednesday, April 16, 2025
Homeराष्ट्रीयबंगाल हिंसाचाराचे बांगलादेश कनेक्शन

बंगाल हिंसाचाराचे बांगलादेश कनेक्शन

कोलकाता : वक्फ बोर्ड दुरुस्ती कायद्यावरुन पश्चिम बंगालमध्ये सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वक्फ विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतरही पश्चिम बंगालमध्ये त्याला जोरदार विरोध करण्यात येत आहे. या विरोधात पश्चिम बंगालच्या मुर्शीदाबादमध्ये हिंसक आंदोलन झाले. या आंदोलनात ३ जणांचा मृत्यू झाला तर २०० जणांना अटक करण्यात आली.

मुर्शिदाबादमधील अनेक ठिकाणी दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर आता हा सर्व पूर्वनियोजत कट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात बांगलादेशी दंगलखोरांचा सहभाग असल्याचा खुलासा प्राथमिक तपासात झाला आहे.

वक्फ कायद्याच्या निषेधाच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराबद्दल केंद्रीय तपास यंत्रणांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. या हिंसाचारामागे बांगलादेशस्थित दहशतवादी संघटना अन्सार उल बांगला टीम असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारत-बांगलादेश सीमेला लागून असलेल्या भागात एबीटी स्लीपर सेल सक्रिय आहेत, जे ब-याच वेळापासून या हिंसाचाराची योजना आखत होते, अशी माहिती माध्यमांनी दिली. सरकारी सूत्रांनुसार, हिंसाचारात काही बांगलादेशी लोकांचा सहभाग होता.

सोमवारी मुर्शिदाबादनंतर दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात इंडियन सेक्युलर फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाड्या जाळल्या होत्या. त्यानंतर पुन्हा बंगालमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. हिंसाचारानंतर, जांगीपूर, धुलियान, सुती आणि शमशेरगंज सारख्या संवेदनशील भागात बीएसएफ, सीआरपीएफ, राज्य सशस्त्र पोलिस आणि आरएएफ जवान तैनात करण्यात आले आहेत. अशातच गृहमंत्रालयाला देण्यात आलेल्या माहितीनुसार, या हिंसाचाराचे नियोजन ब-याच काळापासून केले जात होते. गेल्या ३ महिन्यांपासून परिसरातील लोक ही घटना घडवून आणण्याचा कट रचत होते. यासाठी परदेशातून निधी मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांना मिळालेल्या पुराव्यानुसार या हिंसाचारासाठी सुरुवातीला रामनवमीची तारीख ठरविण्यात आली होती. मात्र कडक सुरक्षेमुळे निर्णय बदलला आणि मग नवीन वक्फ कायद्याच्या मंजुरीनंतर हिंसाचार घडवण्यात आला. तपास यंत्रणेला असाही संशय आहे की हे स्लीपर सेल मुर्शिदाबाद व्यतिरिक्त भारत-बांगलादेश सीमेवरील इतर सीमावर्ती जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारचा हिंसाचार घडवून आणण्याची योजना आखत आहेत. हिंसाचार घडवून आणण्यासाठी परदेशातून पैसे पाठवण्यात आल्याचे पुरावे सापडले आहेत. या पैशाचा वापर गर्दी गोळा करण्यासाठी, सोशल मीडियावर प्रक्षोभक मेसेज पसरवण्यासाठी करण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR