पुणे : पुण्याच्या एका व्यावसायिकाची बिहाराच्या पाटण्यात अपहरण करुन हत्या झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात हल्लेखोरांनी त्यांचा मृतदेह रस्त्यात टाकला होता. जर वेळीच ओळख पटली नसती तर बिहार पोलिस बेवारस म्हणून त्यांचा अंत्यसंस्कार करणार होते अशी धक्कादायक माहीती उघडकीस आली आहे.
पुण्याच्या कोथरुड येथील व्यावसायिक लक्ष्मण साधू शिंदे(५५) यांना काही दिवसांपूर्वी कंपनीचे काही टुल्स आणि मशिनरी स्वस्तात देणार असे आमीष दाखवून ईमेलद्वारे त्यांना बिहारच्या पाटण्यात बोलावून घेतले होते. त्यामुळे लक्ष्मण शिंदे विमानाने पाटणा विमानतळावर पोहचले त्यानंतर त्यांचे अपहरण करण्यात आले. सोमवारी त्यांच्या मृतदेहाला पाटणा विमानतळ पोलिसांनी त्यांचा मृतदेह जहानाबाद जिल्ह्यातून ताब्यात घेतला. जहानाबाद पोलिसांना १२ एप्रिल रोजी लक्ष्मण साधू शिंदे यांचा मृतदेह घोषी पोलिस ठाण्याच्या हद्दीत झुमकी तसेच मानपुर गावाच्या मध्ये रस्त्यावर पडलेला आढळा होता. परंतू मृतदेहाची ओळख पटू शकली नव्हती. पोस्टमार्टेमला हा मृतदेह पाठवून दिला होता.
बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करणार होते
प्राथमिक माहीती नुसार त्यांची अपहरणकर्त्यांनी खंडणी न दिल्याने गळा दाबून हत्या केली असल्याचे उघड झाले आहे. त्यांचा मृतदेह बेवारस समजून त्यावर अंत्य संस्कार करण्याची तयारी चालू असताना पाटणा पोलिसांनी मृतदेहाची ओळख सांगितल्याने प्रक्रिया थांबवली. लक्ष्मण साधु शिंदे हे पुणे येथील कोथरुडच्या एकलव्य कॉलेज जवळील इंद्रायणी को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी डी/०१ येथे राहणारे होते. त्यांचे साडू विशाल लवाजी लोखंडे यांच्या लेखी तक्रारीनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ते पुणे पोलिसांसोबत पाटणा येथे आले होते. पाटणा पोलिसांनी सांगितले की ११ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता शिंदे इंडिगोच्या ६ई-६५३ विमानाने पुण्याहून पाटणाला आले होते. त्यानंतर त्यांनी पत्नीला फोन करुन सांगितले की शिवराज सागी नावाच्या व्यक्तीनी गाडी पाठविली आहे. त्याच वाहनाने झारखंडमध्ये कोल इंडिया कंपनीच्या कार्यालयात जाऊ असे त्यांनी सांगितले होते.