लातूर : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दयानंद कला महाविद्यालयातील प्रा. डॉ. संदीपान जगदाळे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक अधिराज जगदाळे यांनी एक अनोखा उपक्रम राबवला. ‘घर घर संविधान’ या उपक्रमाअंतर्गत बाभळगावजवळील गौड आदिवासी वस्तीवर जाऊन प्रत्येक घरात संविधान उद्देश पत्रिकेचे वाटप करण्यात आले व लोकांना संविधानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
या उपक्रमात डॉ. जगदाळे यांनी संविधानामुळे लोकशाही मूल्यांची जपणूक होते, सर्व नागरिकांना समान अधिकार मिळतात आणि प्रत्येक व्यक्तीस न्याय मिळवण्यासाठी योग्य व्यवस्था संविधानाने निर्माण केली असल्याचे सांगितले. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर यांचे वाचनप्रेम, शिक्षणावरील श्रद्धा व परिवर्तनासाठी केलेले प्रयत्न यावरही मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन म्हणून डॉ. संदीपान जगदाळे यांनी वस्तीतील मुलांना शास्त्रज्ञ, क्रांतिकारक, देशभक्त, संत व समाजसुधारकांची गोष्टीरूप चरित्रे असलेली प्रेरणादायी पुस्तके भेट दिली. या वस्तीतील पुरुष मजुरी व छोट्या व्यवसायांत तर स्त्रिया मसाले विक्रीच्या व्यवसायात गुंतल्या आहेत. अठरा विश्व दारिर्द्यातील परिस्थिती असूनही येथील मुले शिक्षणाच्या प्रवाहात येऊ लागली आहेत, ही सकारात्मक बाब या उपक्रमातून अधोरेखित झाली.
या स्तुत्य उपक्रमाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, ललितभाई शाह, रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, कोषाध्यक्ष संजय बोरा, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ. अंजली जोशी, उपप्राचार्य डॉ दिलीप नागरगोजे, पर्यवेक्षक डॉ प्रशांत दीक्षित, रा.से.यो. जिल्हा समन्वयक डॉ. केशव अलगुले, कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष कदम, तसेच कार्यालयीन अधीक्षक संजय व्यास यांनी डॉ. संदीपान जगदाळे आणि अधिराज यांचे विशेष अभिनंदन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजाच्या प्रत्येक थरापर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम निश्चितच अनुकरणीय आहे.