34.2 C
Latur
Wednesday, April 16, 2025
Homeलातूरजल व्यवस्थापन जनजागृती काळाची गरज: जिल्हाधिकारी

जल व्यवस्थापन जनजागृती काळाची गरज: जिल्हाधिकारी

लातूर : प्रतिनिधी
जल व्यवस्थापनाबाबत जनजागृती व्हावी, यासाठी लातूर जिल्ह्यात जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज पाण्याची उपलब्धता आणि त्याचा योग्य वापर याबाबत जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. तसेच, जलसंवर्धनाचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. या पंधरवड्याच्या कालावधीत प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी कृतीशील योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
राज्य शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत १५ ते ३० एप्रिल या कालावधीत जल व्यवस्थापन कृती पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते जलपूजनाने या पंधरवड्याचे उद्घाटन झाले. यावेळी रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, लातूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंता व प्रशासक श्रीमती आर. डी. ठोंबरे, उपअधीक्षक अभियंता श्रीमती एम. व्ही. तोरणाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश जाधव, लातूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित जगताप, अमर पाटील, एम. आर. काळे, एम. एम. महाजन यांच्यासह उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता आणि सिंचन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांना जलप्रतिज्ञा देण्यात आली. जल व्यवस्थापन कृती पंधरवड्यांतर्गत गावोगावी चित्ररथाद्वारे जनजागृती केली जाणार आहे. या चित्ररथाला जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी हिरवी झेंडी दाखवली. तसेच, लातूर पाटबंधारे विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मोटारसायकल रॅलीचेही आयोजन करण्यात आले.
पंधरवड्याच्या कालावधीत लातूर पाटबंधारे विभागाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत जलसंवर्धन आणि जल व्यवस्थापनाचा संदेश पोहोचवावा. तसेच, पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पांची आणि कालव्यांची दुरुस्ती करण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन हा पंधरवडा यशस्वी करावा, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR