मुंबई : प्रतिनिधी
सन २०२३-२४ च्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मंत्रालयात केली. माजी राष्ट्रीय कबड्डीपटू, संघटक शंकुतला खटावकर यांना जीवनगौरव तर पॅरा ऑलिम्पिक पदक विजेता सचिन खिलारी, जागतिक विजेते आर्चर आदिती स्वामी, ओजस देवतळे, क्रिकेटपटू शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने गौरवित केले जाणार आहे. एकूण ८९ पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली.
पुण्यात शुक्रवार १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार समारंभ होईल. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, उपसभापती डॉ. नीलम गो-हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर व क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
मुंबईत आज शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारासह उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक-जिजामाता पुरस्कार, खेळाडूंसाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, दिव्यांग खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अशा एकूण ८९ पुरस्काराची घोषणा करण्यात आली. १८ खेळाडूंना थेट पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जीवन गौरवसाठी ५ लाख, शिवछत्रपती पुरस्कारासाठी ३ लाख रूपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.