मुंबई : प्रतिनिधी
एसटी कर्मचा-यांचे थकीत ४४ टक्के वेतन खात्यावर जमा करण्यात आले. या आधी मार्च महिन्याचे केवळ ५६ टक्के वेतन देण्यात आले होते. त्यावरून एसटी कर्मचा-यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच विरोधकांनीही राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. आता राज्य सरकारकडून उर्वरित वेतन एसटी कर्मचा-यांच्या खात्यावर जमा करण्यात आले.
या आधी एसटी कर्मचा-यांना केवळ ५६ टक्केच वेतन दिल्यानंतर महामंडळ आणि राज्य सरकारला मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी वित्त विभागाकडे बोट दाखवत नाराजी व्यक्त केली होती.
आमच्या फाईल्स या अर्थ खात्याच्या अधिका-यांकडून अर्थमंत्र्यांपर्यंत पोहोचतच नाहीत. त्या परस्पर परत पाठवल्या जातात, असे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली होती. एसटी कर्मचा-यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेला होण्यासाठी आपण ५ तारखेलाच अर्थमंत्रालयात ठाण मांडू, असेही ते म्हणाले होते.