नाशिक : नाशिकच्या काठे गल्लीतील अनधिकृत दर्गा हटवण्यापूर्वीच काल (१५ एप्रिल) रात्री उशिरा या भागात जोरदार राडा झाला. दर्गा हटवण्याच्या कारवाईपूर्वीच दर्ग्याच्या परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पण अचानक त्या ठिकाणी मोठा जमाव आक्रमक झाला आणि पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत २२ पोलिस जखमी झाले असून अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. पण पोलिसांनी काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या पोलिस बंदोबस्तात पहाटेपासून दर्गा हटवण्याचे काम सुरू आहे. काठे गल्ली परिसरात तणावाचे वातावरण असून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नाशिकच्या काठे गल्ली परिसरात असलेला अनधिकृत दर्गा आज (१६ एप्रिल) हटवण्याची कारवाई होणार होती. मात्र, काल रात्रीच या कारवाईबाबत अफवा पसरल्यानंतर काही नागरिकांनी काठे गल्ली गाठली. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे जमाव आणखी आक्रमक झाला. दर्गा हटवण्यापूर्वीच अफवा पसरवण्यात आल्याने परिस्थिती चिघळली. घटनास्थळी आधीच ५०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मात्र, त्याचवेळी ४०० पेक्षा अधिक लोकांचा जमाव त्या ठिकाणी एकत्र झाला. जमावाने आक्रमक होत पोलिसांवर दगडफेक केली. या हिंसाचारात अनेक पोलिस जखमी झाले आहेत.
नाशिकच्या काठे गल्ली परिसरात असलेल्या अनधिकृत दर्गा हटवण्याच्या कारवाईदरम्यान काल रात्री तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. जमावाने केलेल्या दगडफेकीत दोन सहाय्यक पोलिस आयुक्त आणि २० हून अधिक पोलिस कर्मचारी जखमी झाले असून, एका पोलिस कर्मचा-याच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे.
दगडफेक करणा-या जमावातील काही जणांना पोलिसांनी अटक केली असून, सध्या आठपेक्षा अधिक लोक पोलिसांच्या ताब्यात आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस सातत्याने प्रयत्नशील आहेत. या घटनेनंतर काठे गल्ली परिसरातील वाहतूक मार्गात अनेक बदल करण्यात आले असून, नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नोटीस देऊनही कारवाई टाळली
नाशिक महानगरपालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिल रोजी या अनधिकृत दर्ग्याला नोटीस बजावली होती. स्वत:हून हे बांधकाम हटवण्याची सूचना देण्यात आली होती, अन्यथा महापालिकेकडून तोडकाम करण्यात येईल असा इशारा दिला होता. मात्र, मुदत संपल्यानंतरही कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्यामुळे १५ एप्रिलपासून पालिकेकडून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही कारवाई सुरू असून, दर्गा परिसराच्या १०० मीटर परिसरात बॅरिकेडिंग लावण्यात आले आहेत.